PM मोदींच्या हस्ते प्रकल्पांचा धमाका; लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2024 09:19 AM2024-01-25T09:19:28+5:302024-01-25T09:20:41+5:30

मडगावात हजारोंची होणार सभा 

pm narendra modi lok Sabha election campaign will start in goa | PM मोदींच्या हस्ते प्रकल्पांचा धमाका; लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार

PM मोदींच्या हस्ते प्रकल्पांचा धमाका; लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडणार

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. ६ फेब्रुवारी रोजी गोवा भेटीवर येणार आहेत. त्यांच्या हस्ते चार वेगवेगळ्या सरकारी प्रकल्पांचे उ‌द्घाटन आणि तीन प्रकल्पांची पायाभरणी केली जाणार आहे. तसेच मडगावमध्ये मोदी जाहीर सभा घेणार असून हजारोंच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळही फोडतील.

मोदींची गोवा भेट निश्चित झाल्याने विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळापत्रकातही बदल करण्यात येणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. लोकसभा निवडणूक तोंडावर असताना मोदी गोव्यात येत आहेत. त्यामुळे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी भाजपला हीच नामी संधी आहे. मोदींच्या हस्ते सरकारी प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत विकासकामांची माहिती पोहोचविण्याचा पक्षाचा प्रयत्न राहील. 

मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीतही मोदी यांच्या गोवा भेटीबद्दल मुख्यमंत्र्यांनी सहकारीमंत्र्यांना माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय ऊर्जा सप्ताहाचे उ‌द्घाटन करण्यासाठी मोदी गोव्यात येत आहेत.

बेतूल येथे हा कार्यक्रम झाल्यानंतर ते मडगाव येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. कुंकळ्ळी येथे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दोनापावला येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वॉटर स्पोर्टस्, बेती येथील आयएनएस मांडवी नेव्हल वॉर कॉलेजचे नवीन कॅम्पस, कुडचडे येथील एकात्मिक कचरा व्यवस्थापन सुविधा या चार प्रकल्पांचे उ‌द्घाटन मोदीजी मडगाव येथून व्हर्चुअल पद्धतीने करणार आहेत. रेडश मागूश येथे पीपीपी तत्त्वावर घातलेला बहुप्रतीक्षित रोप वे प्रकल्प, पाटो-पणजी येथे श्री डी-प्रिंटेड इमारत, शेळपे-साळावली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाची पायाभरणी मोदींच्या हस्ते व्हर्चुअल पद्धतीनेच होणार आहे.

विधानसभा अधिवेशनाच्या वेळापत्रकात बदल होणार

मोदींच्या आगमनामुळे विधानसभा कामकाजाच्या वेळपत्रकातही बदल केले जाण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कामकाज सल्लागार समितीची बैठक आज, २५ रोजी होणार आहे. दि. २ ते ९ फेब्रुवारी असे विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ठरले होते. प्रत्यक्ष सहा दिवस कामकाज होणार होते. परंतु आता येत्या ६ रोजी मोदीजींची गोवा भेट निश्चित झालेली आहे. आज, २५ रोजी सभापतींनी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलावली असून या बैठकीत निर्णय होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आमदारांशी संवाद साधणार

मोठ्या संख्येने लोक आणण्याची जबाबदारी प्रत्येक आमदार, मंत्र्यांवर सोपवलेली आहे. त्यामुळे ६ रोजी मडगावच्या सभेला हजारोंच्या संख्येने लोक जमतील, असा अंदाज आहे. २०२२ मध्ये मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या येथील उ‌द्घाटनासाठी आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी पक्षाच्या सर्व आमदार, मंत्र्यांशी संवाद साधला होता. येत्या ६ रोजी गोवा भेटीवेळीही ते आमदारांशी संवाद साधतील. येत्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने ते काय कानमंत्र देतात याबद्दल उत्कंठा आहे.

वादग्रस्त १६ ब रद्द, मंत्रिमंडळ निर्णय : नवी तरतूद येणार

नगर नियोजन कायद्यातील वादग्रस्त ठरलेल्या कलम १६ ब तरतूद अखेर रद्द करण्यात आली असून, नवीन कायदादुरुस्ती येत्या विधानसभा अधिवेशनात येणार आहे. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत या कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. आता प्रादेशिक आराखडा किंवा बाह्य विकास आराखडा यापैकी कोणत्याही आराखड्यातील जमिनीचा झोन बदलायचा झाल्यास ३० दिवसांची नोटीस द्यावी लागेल. या कलमाच्या आधारे मोठ्या प्रमाणात भू रूपांतरे करण्यात आल्याचा आरोप केला जात होता. एखाद्या वर्तमानपत्रांमध्ये छोटीशी जाहिरात द्यायची आणि केवळ गावाचे नाव आणि सव्र्व्हे क्रमांक एवढाच उल्लेख करून ही भू रूपांतरे करण्यात आली, असे विरोधकांचे म्हणणे होते. दरम्यान, गोवा मोटार वाहन कर (सुधारणा) अध्यादेशाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली. उच्च श्रेणीतील वाहनांच्या करात कपात केली आहे. हे करताना कर संरचना तर्कसंगत केली. गोवा कामगार कल्याण कायदा दुरुस्तीलाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. केंद्रीय जीएसटी मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोवा सरकारनेही जीएसटीमध्ये काही किरकोळ बदल केले.
 

Web Title: pm narendra modi lok Sabha election campaign will start in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.