पीएम विश्वकर्मा योजना कारागिरांना पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी प्रोत्साहन देईल: श्रीपाद नाईक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 04:17 PM2023-09-18T16:17:45+5:302023-09-18T16:18:20+5:30
पर्यटन मंत्रालयाकडून गोव्यामध्ये पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन.
नारायण गावस, पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने पारंपरिक कारागीर आणि शिल्पकारांसाठी पीएम विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ केला. या पीएम विश्वकर्मा योजनेमुळे देशातील त्या कारागीरांना आणि शिल्पकारांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांचे रक्षण होईल, जे प्रतिकूल परिस्थितीमुळे या पारंपरिक व्यवसायामध्ये काम करण्यासाठी फारसे इच्छुक नाहीत, असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने गोव्यामध्ये पणजी येथे आयोजित केलेल्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात ते बोलत होते.
ही योजना समावेशकतेवर आधारित आहे, असे त्यांनी सांगितले. “ या पारंपरिक व्यवसायात असलेले कारागीर आणि शिल्पकार काही वेळा हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी फारसे उत्सुक नसतात. मात्र, पीएम विश्वकर्मा योजना त्यांना हा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहित करते. त्याच प्रकारे युवा वर्गाला देखील त्यांच्या पारंपरिक व्यवसायात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देते. त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी आवश्यक असलेले अर्थसाहाय्य मिळवणे सोपे होते आणि त्यांच्या कौशल्यात वाढ करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळवता येते,” अशी माहिती मंत्र्यांनी दिली.कोणत्याही व्यवसायासाठी भांडवलाची सर्वात मोठी आवश्यकता असते असे सांगून पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
देशाची सेवा करत असताना पंतप्रधान मोदी अंत्योदयाच्या सिद्धांताचे अनुसरण करत आहेत, असे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले. पंतप्रधान नेहमीच समाजाच्या उपेक्षित घटकांचा विचार करत असतात. पीएम विश्वकर्मा योजना समाजामध्ये कारागीरांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे, असे तानावडे म्हणाले. गोव्याचे कृषी, हस्तकला आणि नागरी पुरवठामंत्री रवी नाईक यांनी देखील या कार्यक्रमात आपले विचार व्यक्त केले. यावेळी केंद्रीय आणि राज्य सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.