गोव्यात मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Published: March 22, 2017 05:46 PM2017-03-22T17:46:51+5:302017-03-22T17:46:51+5:30
उत्तर गोव्यातील पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातून विषबाधा
ऑनलाइन लोकमत
म्हापसा, दि. 22 -उत्तर गोव्यातील पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या माध्यान्ह आहारातून विषबाधा झाली आहे.
पर्वरी येथील सरकारी प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना तेथीलच गायत्री सेल्फ हेल्प ग्रुपतर्फे मध्यांतरात माध्याह आहार योजनेअंतर्गत खाद्य पुरविण्यात येते. बुधवारी नेहमीप्रमाणे येथील पाव भाजी पुरविण्यात आली. गटवारप्रमाणे प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना सदर पाव भाजी देण्यात आली असता प्रथम सोळा विद्यार्थ्यांनी ती पावभाजी खाल्लयानंतर उलटी, जुलाब होण्यास सुरुवात झाली. विद्यालयाच्या प्राचार्य अंजली मळीक यांनी त्वरित पर्वरीतील आरोग्य सेवा केंद्राला कळविले. सेवा केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर रोशन नाझारेथ यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन बाधित विद्यार्थ्यांवर उपचार केले. एकूण १६ विद्यार्थ्यांना अन्नाची बाधा झाली होती. १६ पैकी १२ विद्यार्थ्यांना प्राथमिक इलाज करून घरी पाठविण्यात आले. बाधित चार विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेद्वारे गोमेकॉमध्ये पाठविण्यात आले आहे.
महसूलमंत्री रोहन खंवटे, तसेच शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट यांनी त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन संबंधित संस्थेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. फॉरेन्सिक लॅबोरेटरीचे तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांना पुरविलेल्या खाद्य पदार्थाचे सॅम्पल हस्तगत करून पुढील तपासासाठी पाठविले आहेत. (प्रतिनिधी)