गोव्यातील बीचवर मुलीचा विनयभंग; पुण्यातील ११ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 04:30 PM2018-05-30T16:30:21+5:302018-05-30T16:30:21+5:30
बागा बीचवर ही मुलगी तिच्या १७ वर्षीय भावासह बसली होती.
म्हापसा : गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील ९ जणांना कळंगुट पोलिसांनी दंगा माजवणे, विनयभंग तसेच दोन अल्पवयीन मुलांना मारहाण करणे अशा विविध आरोपाखाली अटक केली आहे.
कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री कळंगुट नजीकच्या बागा येथील किनाऱ्यावर ही घटना घडली. घडलेल्या प्रकारासंबंधी त्या अल्पवयीन मुलांच्या मातेने तक्रार केल्यानंतर ही अटक करण्यात आली.
संबंधित प्रकरणातील तक्रारदार महिला बागा येथील किनाऱ्यावर असलेल्या शॅकमध्ये बसली होती. तर तिची दोन अल्पवयीन मुले किनाऱ्यावर फिरत होती. त्याचवेळी तेथून जात असलेल्या ११ जणांच्या गटाने त्या मुलांचे मोबाइलवर फोटो काढण्यास सुरुवात केली. आपल्या बहिणीचे फोटो काढत असल्याचे बघून त्या अल्पवयीन मुलीच्या भावाने त्यांना जाब विचारायला सुरुवात केली. त्यावेळी त्या गटातील काही जणांनी त्याला मारहाण करण्यात सुरुवात केली. घडलेल्या घटनेनंतर लागलीच त्या मुलीच्या मातेने घडलेल्या प्रकाराचे कथन कळंगुट पोलीस स्थानकावर जाऊन केले व नंतर त्याची रीतसर तक्रार नोंद केली.
त्यानंतर पोलिसांनी तात्काळ सर्व आरोपांची शोध घ्यायला सुरुवात केली. गोव्यातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना अटक करुन पोलीस स्थानकावर आणण्यात आले व त्यांच्यावर विविध गुन्ह्यांखाली तक्रार नोंद केली. या प्रकरणात गुंतलेल्या ११ जणातील दोघे अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी पणजी नजिक मेरशी येथे असलेल्या अपना घरात करण्यात आली आहे. पुण्यातील मुलांचा हा गट दोन दिवसापूर्वी गोव्यात फिरण्यासाठी आलेला. अटक करण्यात आलेल्यात रमेश कांबळी, संकेत भादले, कृष्णा पाटील, सत्येम लंबे, अनिकेत गुरव, ऋषीकेश गुरव, आकाश सुवास्कर, सनी मोरे व ईश्वर पांगरे यांचा समावेश आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलांची एनजीओच्या उपस्थितीत जबानी नोंद केली आहे. फोटो काढण्यासाठी वापरण्यात आलेला मोबाइल फोन ताब्यात घेण्यात आला असून चाचणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवून देण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक महेश नाईक निरीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.