बनावट सोने विकणाऱ्या ठगांना पोलिसांनी केले गजाआड
By पंकज शेट्ये | Published: April 19, 2023 09:47 PM2023-04-19T21:47:42+5:302023-04-19T21:47:51+5:30
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर कल्याण ठाणे - महाराष्ट्र येथील रवी सोलंकी आणि पुणे, महाराष्ट्र येथील इश्वर गुजराती यांना अटक करण्यात आली.
वास्को: खऱ्या सोन्याच्या नावाने बनावट सोन्याचे ऐवज विकून मडगाव येथील मनोज सिंग याला पाच लाखांना ठगलेल्या प्रकरणी वेर्णा पोलीसांनी महाराष्ट्र येथील रवी सोलंकी (वय ३३) आणि इश्वर गुजराती (वय ३३) नामक दोन तरुणांना अटक केली. रत्नागीरी येथे खोदकाम करताना आम्हाला एका कलशात २० लाखाचे सोन्याचे ऐवज सापडले असून चार हप्त्यात तु त्या सोन्याची रक्कम भर असे सांगून संशयित आरोपींनी मनोज याच्याकडून पाच लाख घेऊन त्याला लुभाडले. मनोज याला लुभाडलेल्या त्या प्रकरणात सोनी राथोड नामक एका महीलेचा समावेश असून पोलिसांनी तिला चौकशीसाठी बोलवण्याकरिता नोटीस पाठवल्याची माहीती पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली.
वेर्णा पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार मंगळवारी मध्यरात्रीनंतर कल्याण ठाणे - महाराष्ट्र येथील रवी सोलंकी आणि पुणे, महाराष्ट्र येथील इश्वर गुजराती यांना अटक करण्यात आली. दक्षिण गोव्यातील गोगळ, मडगाव येथील मनोज सिंग (वय ३०) नामक तरुणाने मंगळवारी उशिरा रात्री पोलीस स्थानकात त्याला लुभाडल्याची तक्रार नोंद केली. त्याबाबत अधिक माहीतीसाठी पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांना संपर्क केला असता डीसेंबर महीन्यात महाराष्ट्रा येथील रवी सोलंकी, इश्वर गुजराती ह्या दोन तरुणासहीत सोनी राथोड नावाच्या एका महीलेने मनोज याला संपर्क केला.
रत्नागीरी येथे खोदकाम करताना तेथे आम्हाला एक कलश सापडला असून त्यात २० लाखाचे सोन्याचे ऐवज असल्याचे त्यांनी मनोजला सांगितले. ते ऐवज तु घे असे त्यांनी मनोजला सांगितल्यानंतर ऐवढी रक्कम माझ्याशी नसल्याचे मनोजने तिघांना सांगितले. पहील्या वेळेत सोन्याचे ऐवज घेण्यास मनोज तयार झाला नसल्याने नंतर अन्य दोन वेळा ते तिघे मनोजला भेटले. त्या २० लाखाच्या सोन्याचे प्रथम पाच लाख दे अन् नंतर हप्त्यात बाकीची रक्कम भर असे तिघांनी मनोजला सांगून त्याला ते सोने घेण्यास तयार केला. मनोजने त्यांना पाच लाख देऊन ते सोन्याचे ऐवज घेतले. त्यानंतर ते सोने मनोजने तपासले असता ते बनावट असून आपली तिघांनी फसवणूक केल्याचे त्याच्यासमोर उघड झाले.
आपली फसवणूक केलेल्या तिघांचा मनोजने शोध घेण्यास सुरवात केल्यानंतर मंगळवारी ते त्यांना दिसून आले. त्यांनी त्वरित पोलीस स्थानकात तक्रार दिल्यानंतर पोलीसांनी कारवाई करून रवी सोलंकी आणि इश्वर गुजराती विरुद्ध भादस ४२० आरडब्ल्यु ३४ कलमाखाली गुन्हा नोंद करून त्यांना अटक केल्याची माहीती पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. खºया सोन्याच्या नावाखाली मनोजला ठगून त्याला विकलेले २ कीलो ८०० ग्राम वजनाचे बनावट सोने पोलीसांनी जप्त केल्याची माहीती निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली.
दरम्यान ह्या ठग प्रकरणातील सोनी राथोड ह्या महीलेला पोलीसांनी चौकशीकरिता बोलवण्यासाठी नोटीस पाठवल्याची माहीती पोलीस निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. अटक केलेल्या त्या गटाने आणखीन कोणाला ठगले आहे काय त्याबाबतही पोलीस चौकशी करणार असल्याचे निरीक्षक डायगो ग्राशियस यांनी सांगितले. वेर्णा पोलीसांनी अटक केलेल्या रवी आणि इश्वर यांना न्यायालयात उपस्थित केला असता त्यांना दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्याचा आदेश बजावण्यात आला आहे. वेर्णा पोलीस अधिक तपास करित आहेत.