पर्रीकर, पार्सेकरविरोधात काँग्रेसकडून दक्षता खाते, पोलिसात तक्रारी सादर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 08:55 PM2018-10-03T20:55:45+5:302018-10-03T20:56:07+5:30

राज्यात ८८ खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नूतनीकरण केल्याचा आरोप करीत काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात दक्षता खाते तसेच पोलिसात तक्रार केली आहे. 

Police Complaint against Parrikar and Parsekar, from Congress | पर्रीकर, पार्सेकरविरोधात काँग्रेसकडून दक्षता खाते, पोलिसात तक्रारी सादर  

पर्रीकर, पार्सेकरविरोधात काँग्रेसकडून दक्षता खाते, पोलिसात तक्रारी सादर  

Next

पणजी : राज्यात ८८ खाण लिजांचे बेकायदेशीररित्या नूतनीकरण केल्याचा आरोप करीत काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्याविरोधात दक्षता खाते तसेच पोलिसात तक्रार केली आहे. 

५ नोव्हेंबर २0१४  ते १२ जानेवारी २0१५ या कालावधीत पर्रीकर आणि पार्सेकर हे मुख्यमंत्रीपदी होते. दुस-यांदा झालेले ८८ खाण लीजांचे नूतनीकरण हे याच कालावधीत झाल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. बेकायदा लीज नूतनीकरण करुन घोटाळा केल्या प्रकरणी वरील सर्वांविरुध्द भादंवि कलम ४0६, ४२0, १२0 ब खाली गुन्हे नोंदवावेत, अशी मागणी या तक्रारीत प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी केली आहे. दक्षता खात्याचे प्रमुख या नात्याने मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा आणि पोलिस महासंचालक मुक्तेश चंदर यांच्या कार्यालयात तक्रारी सादर करण्यात आल्या. मुख्य सचिव उपस्थित नव्हते त्यामुळे कार्यकारी मुख्य सचिव डब्ल्यु व्ही. रमणमूर्ती यांच्याकडे तक्रार सादर करण्यात आली. 

खाण खात्याचे तत्कालीन सचिव पवनकुमार सेन, खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य व मुख्यमंत्र्यांचे सचिव कृष्णमूर्ती यांच्याविरुध्दही तक़्रार दिलेली आहे. खाणींच्या लिलांवाची वाट मोकळी करण्यासाठी एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करण्यात येत असताना आदल्या दिवशी घिसाडघाईने या खाण लिजांचे दुस-यांदा नूतनीकरण करण्यात आले. या प्रकरणात मोठा घोटाळा असल्याचा आरोप आहे. 

८८ खाण लिजांचे नूतनीकरण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविताना गेल्या ७ फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवाड्याचा हवालाही या तक्रारीत देण्यात आलेला आहे. या निवाड्यात परिशिष्ट ११७ मध्ये सरकारने लीज नूतनीकरणाबाबत घिसाडघाई केल्याचे स्पष्ट निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. एमएमडीआर कायद्यात दुरुस्त्या यायच्या आधी घिसाडघाईने लीज नूतनीकरण केल्याचेही म्हटले आहे. 

पर्रीकर विरोधी पक्षनेते असताना सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी खाण घोटाळ्याबाबत अहवाल तयार केला होता परंतु समितीवरील अन्य सदस्यांनी त्याला स्वीकृती न दिल्याने हा अहवाल सभागृहासमोर येऊ शकला नाही. त्यानंतर पर्रीकर यांनी लोकांची दिशाभूल करण्यास सुरवात केली आणि तत्कालीन काँग्रेस सरकार आणि काँग्रेसच्या नेत्यांवर खाण घोटाळा प्रकरणात खोटे आरोप करण्यास सुरवात केल्याचेही या तक्रारीत म्हटले आहे. हे आरोप खोटे होते हे आता उघड झालेले आहे, असे पक्षाचे म्हणणे आहे.

दरम्यान,  मुख्य सचिवांच्या कार्यालयात तक्रार देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात आमदार रेजिनाल्द लारेन्स, दयानंद सोपटे, नीळकंठ हळर्णकर, दोन्ही जिल्हाध्यक्ष विजय भिके आणि ज्यो डायस, महिला प्रदेश अध्यक्षा प्रतिमा कुतिन्हो, गटाध्यक्ष यांचा समावेश होता.  

असे झाले लीज नूतनीकरण 

१३ लीज वगळता अन्य सर्व लिजांचे एमएमडीआर कायद्याचा मसुदा जाहीर झाल्यानंतर सरकारने नूतनीकरण केले. ५ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २0१४ या कालावधीत १३ लिजांचे नूतनीकरण केले. १0 डिसेंबर २0१४ ते २ जानेवारी २0१५ या कालावधीत १९, ५ जानेवारी २0१५ ते १२ जानेवारी २0१५ या काळात ५६ व १२ जानेवारी २0१५ रोजी ३१ खाण लिजांचे नूतनीकरण केल्याचा हवाला सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा हवाला देऊन या तक़्रारीत देण्यात आला आहे. 

 

 

Web Title: Police Complaint against Parrikar and Parsekar, from Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा