अर्ध्यावर सुटली साथ; टेम्पोच्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबल ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 01:37 PM2023-04-29T13:37:29+5:302023-04-29T13:38:54+5:30
पणजी पोलिस मुख्यालयातील एमटी विभागात सेवेत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : गवंडाळी- जुने गोवे येथे टेम्पोने दुचाकीला दिलेल्या धडकेत पोलिस कॉन्स्टेबल प्रदीप तुळशीदास परब (वय ४५) हे ठार झाले. तर त्यांची पत्नी माधुरी यादेखील जखमी झाल्या आहेत. परब हे पणजी पोलिस मुख्यालयातील एमटी विभागात सेवेत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप काल, शुक्रवारी सकाळी (जीए ०७ एम ३३०३) क्रमांकाच्या दुचाकीवरून पत्नीसोबत सांतईस्तेव येथील आपल्या घरून कामासाठी पणजीला येत होते. परब यांची पत्नी माधुरीही पणजीत कामाला आहे. त्याचवेळी (जीए ०२ टी ७०७४) या क्रमांकाचा टेम्पो माशेलहून कुंभारजुवेच्या दिशेने जात होता. गवंडाळे पुलानजीक पोहोचताच टेम्पोने खोली औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या दिशेने अचानक वळण घेतले असता त्याची परब यांच्या दुचाकीला जोरदार धडक बसली.
या धडकेत प्रदीप पत्नीसह रस्त्यावर जोरदार आदळले. तर दुचाकी टेम्पोखाली गेल्याने तिचा चक्काचूर झाला. रस्त्यावर दोघे पडल्याने प्रदीप यांच्या डोक्याला जबर मार बसला व त्यातच त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव झाला. प्रदीप यांनी हेल्मेट घातले होते, मात्र टेम्पोने धडक दिल्याने हेल्मेट बाजूला फेकले गेले.
अपघात घडतात तेथील लोकांनी त्वरित रुग्णवाहिका बोलावून त्यांना जुने गोवे येथील खासगी इस्पितळात नेले. मात्र, प्रदीप यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर त्यांच्या पत्नी माधुरी या जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. प्रदीप यांच्या पश्चात दोन मुले आहेत. जुने गोवे पोलिस तपास करीत आहेत.
'त्या' ठरावाकडे दुर्लक्ष
गेल्या वर्षभरात याच धोकादायक वळणावर १५ हून जास्त छोटे-मोठे अपघात झाले आहेत. यापूर्वी ही घटनास्थळी मृत्यू झाल्याचे स्थानिक पंच सांगत होते. वाढत्या अपघातांची दखल घेत कुंभारजुवे पंचायतीने या ठिकाणी उपाययोजना करण्याबाबतचा ठराव घेतला होता. तो ठराव जिल्हाधिकाऱ्यांनाही पाठवला. मात्र, अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"