पोलिस कॉन्स्टेबलने घेतला गळफास; बेताळभाटी-सावईवेरे येथील घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:40 IST2023-11-21T17:40:05+5:302023-11-21T17:40:22+5:30
सकाळी उठल्यानंतर बहिणीच्या निर्दशनास आली घटना

पोलिस कॉन्स्टेबलने घेतला गळफास; बेताळभाटी-सावईवेरे येथील घटनेने खळबळ
गीतेश वेरेकर, सावईवेरे : फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय युवा पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज, मंगळवारी सकाळी उघडकीस आला आहे. पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात तो सेवा बजावित होता.
पाच वर्षांपूर्वी योगेश्वरचे वडील सुरेश सावंत (मूळ एकोशी-पोंबुर्फा) व आठ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू झाला होता. बेताळभाट-सावईवेरे येथील नव्या घरात गेल्या चार वर्षापासून सावंत कुटुंब वास्तव्यास आहे. सध्या तो आपल्या लहान बहिणीसोबत राहत होता. मात्र या घरातील बेडरूममध्येच त्याने गळफास लावून जीवन संपवले.
सकाळी उठल्यानंतर बहिणीच्या निर्दशनास ही घटना आली. तिने तत्काळ पोलिस स्थानकात माहिती देताच म्हार्दोळचे पोलिस उपनिरीक्षक सुशांत सांगोडकर यांनी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो तणावाखाली असल्याची माहिती समोर येत आहे.