नववर्ष स्वागताच्या गर्दीवर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्यांचीही नजर; ड्रंक अॅंन्ड ड्राईव्ह विरोधातही मोहीम
By जितेंद्र कालेकर | Published: December 29, 2023 05:12 PM2023-12-29T17:12:26+5:302023-12-29T17:14:38+5:30
सशस्त्र पायी आणि व्हॅनद्वारेही गस्त.
जितेंद्र कालेकर, ठाणे : नववर्ष स्वागताच्या पाटर्या आणि गर्दीवर ठाणे शहर पोलिसांची करडी नजर राहणार असून कोणीही उत्सवाच्या नावाखाली मद्यप्राशन, छेडछेडीसारखे गैरप्रकार करु नयेत, असे आवाहन सह पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी केले आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच त्यावर नियंत्रणासाठी सीसीटीव्ही तसेच ३६ ड्रोन कॅमेऱ्यांचीही मदत घेतली जाणार आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या क्षेत्रात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केल्याचेही त्यांनी सांगितले.
नववर्ष स्वागत आणि सरत्या वर्षाला निरोपाच्या निमित्ताने आयोजित हाेणाऱ्या पाटर्यांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनीही जय्यत तयारी केल्याचे कराळे यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय जाधव आणि वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विनय राठोड हेही उपस्थित होते.
३१ डिसेंबर २०२३ रोजी रितसर परवानगीने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी, महत्वाचे चौक तसेच रस्ते, चौपाटी, मैदाने त्याचबरोबर गर्दी जमा होणाऱ्या ठिकाणांवर पोलिसांची सशस्त्र पायी आणि मोबाईल गस्त राहणार आहे. याशिवाय, फिक्स पॉईंट तसेच प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गांवर नाकाबंदीचे आयोजन केलेले आहे. महिला व मुलींची छेडछाड, विनयभंग, सोनसाखळी तसेच मोबाईल स्नॅचिंग आदी प्रकार रोखण्यासाठी दामिनी पथक, छेडछाड विरोधी पथक, गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांचे विशेष पथक नियुक्त केले आहे.याशिवाय, सीसीटीव्ही
आणि विविध मोक्याच्या ठिकाणी ड्रोन कॅमेरांव्दारेही लक्ष ठेवले जाणार आहे. साध्या वेषातील पोलिसही बंदोबस्तासाठी नियुक्त राहतील. यावेळी १८ युनिट मार्फत ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह विरोधी मोहीमही राबविली जाणार असून ३७ िब्रथ ॲनालायझरद्वारे मदयपी संशयित चालकांची तपासणी केली जाणार आहे.
पाेलिसांच्या सुटयाही रद्दद-
नववर्ष स्वागताच्या बंदोबस्तासाठी पाेलिसांच्या सुटया रद्द केल्या असून स्थानिक पाेलिसांबराेबरच गुन्हे शाखा,
आर्थिक गुन्हे शाखा, सायबर, विशेष शाखा, पोलीस मुख्यालय, वाहतुक शाखा जलद प्रतिसाद पथक, पोलीस नियंत्रण कक्ष, अतिक्रमण विरोधी पोलीस पथक, एसआरपीएफसह महिला पोलीस अमलदार तसेच सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप आयुक्त, अपर पोलीस आयुक्त यांच्यासह माेठा बंदाेबस्त तैनात आहे.
रात्री १२ पर्यंत राहणार ध्वनीक्षेपकाला परवानगी-
ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ पर्यंत परवानगी असून शाकाहारी हटिल, परमिटरूम, रेस्टॉरंट, आॅर्केस्ट्रा बार यांना पहाटे १. ३० ते ५ वाजेपर्यंत परवानगी दिल्याचेही त्यांनी सांगितले.