गोव्यात सांताक्लॉज बनून पोलिस करताहेत पर्यटकांमध्ये मास्क वापरासाठी जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 03:17 PM2020-12-24T15:17:22+5:302020-12-24T15:17:34+5:30
पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी यांचा अभिनव उपक्रम
पणजी : गोव्यात पोलीस सांताक्लॉज बनून पर्यटकांमध्ये मास्क वापराविषयी जनजागृती करीत आहेत. पेडणे पोलीस स्थानकाचे निरीक्षक जिवबा दळवी व त्यांच्या पथकाने हरमल तसेच अन्य किनाऱ्यांवर गेल्या दोन दिवसात धडाक्यात ही जागृती चालवली असून सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
नाताळ सणासाठी देशी पाहुण्यांची गोव्यातील किनाऱ्यांवर तसेच धार्मिक स्थळांवर मोठी गर्दी आहे. निरीक्षक दळवी यांनी बुधवारी सायंकाळी हरमल किनार्याला पथकासह भेट दिली. तेथे काही पर्यटक विना मास्क वावरताना त्यांना दिसले. सांताक्लॉज बनलेल्या पोलिसांनी या पर्यटकांना चॉकलेट ऐवजी मास्क देऊन कोविडच्या या महामारीत मास्क वापरणे किती महत्त्वाचे आहे हे समजावून सांगितले. निरीक्षक दळवी यांनी पर्यटकांना अशीहु समज दिली की मास्क न वापरल्याबद्दल २०० रुपये दंड ते ठोठावू शकले असते. परंतु तसे न करता केवळ जागृती म्हणून हा उपक्रम हाती घेतला आहे. पर्यटकांनी गोव्यात फिरताना महामारीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करायला हवे. तोंडावर मास्क परिधान करायलाच हवा, अशी समज त्यांनी पर्यटकांना दिली. पेडणे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस शिपाई आदी पथक त्यांच्याबरोबर होते. यातील एकाने सांताक्लॉजचा वेष परिधान केला होता. सांता क्लॉज लहान मुलांमध्ये चॉकलेट देणारा म्हणून परिचित आहे.परंतु यावेळी सांताक्लॉजच्या वेशातील पोलिसांनी पर्यटकांना चॉकलेट न देता मास्क दिले.
पोलीस निरीक्षक दळवी हे एकेक अभिनव उपक्रम करण्यात अग्रेसर असतात. २०१८ च्या डिसेंबरमध्ये त्यांनी कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक असताना नाताळात सांताक्लॉज बनून तेथील वृद्धाश्रमांना आणि अनाथाश्रमांना भेट देऊन ज्येष्ठ नागरिक व बेवारस मुलांना भेटवस्तू दिल्या होत्या. या आठवणी अजूनही या वृद्धाश्रमात जागवल्या जातात.
गोव्यात सध्या नाताळ सणाचा माहोल असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण संचारले आहे. अशा वातावरणात पोलीस तरी या सणाचा आनंद लुटण्यासाठी कसे बरे दूर राहतील? जगाच्या नकाशावर लौकिक मिळवलेल्या हरमल किनाऱ्यावर निरीक्षक दळवी व त्यांच्या सहकारी पोलिसांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने असा नाताळ साजरा केला.
निरीक्षक दळवी 'लोकमत'शी बोलताना म्हणाले की, 'जनता आणि पोलीस यांच्यातील संवाद वाढावा या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. मास्क न वापरणाऱ्या पर्यटकांना आम्ही समजही दिली तसेच या सर्वांना आम्ही नाताळच्या शुभेच्छाही दिल्या.