मेरशी हल्ल्यामागे पोलीस निष्क्रियता
By Admin | Published: June 16, 2017 02:14 AM2017-06-16T02:14:51+5:302017-06-16T02:14:51+5:30
लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा
लोकमत न्यूज नेटवर्क
पणजी : मुंबईतील पर्यटकांवर जीवघेण्या हल्ल्याच्या थरारानंतर मेरशी गाव दहशतीखाली वावरत आहे. चारपैकी तिघा हल्लेखोरांचा गुंडगिरी हाच व्यवसाय असून चौथा हल्लीच त्यांच्या चमूत सामील झाला आहे. हे लोक कुणाचा तरी घात केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी या भागात चर्चा आहे; परंतु दहशतीमुळे उघडपणे बोलण्यास कुणीही धजत नाही.
मुंबईतील पर्यटकांपैकी एका प्रौढ गृहस्थाचा हात चुकून लॉरेन्स डायस याला लागला. तेव्हा ‘तू मला हात लावलासच कसा?’ असे म्हणत त्या प्रौढ गृहस्थाच्या थोबाडीत लगावून भांडण करणारा लॉरेन्स हाच या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. बिचाऱ्या त्या पर्यटकाने मार खाऊन देखील हे प्रकरण हॉटेलमध्येच मिटविण्यासाठी लॉरेन्ससमोर हातही जोडले होते. मात्र, लॉरेन्स काहीच न बोलता शांत राहिला, त्यामुळे हे प्रकरण मिटले समजून पर्यटक निघून गेले. परंतु ते पर्यटक निघताच लॉरेन्सने तिथूनच आपल्या साथीदारांना फोन केला व त्या पर्यटकांवर सशस्त्र हल्ला चढविण्याचा बेत आखला आणि तो अमलातही आणला.
सीसीटीव्ही फोडण्याची धमकी
ज्या हॉटेलमध्ये मुंबईतील पर्यटक चहा आणि नाश्ता करण्यासाठी थांबले होते त्या हॉटेलमध्ये लॉरेन्स याने केलेला सर्व हंगामा तेथील सीसीटीव्हीत टिपला गेला आहे. भांडणानंतर सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्यासाठी लॉरेन्सकडून हॉटेलवाल्यांना सुनावले होते. ते फुटेज पोलिसांकडे पोहोचल्यास सीसीटीव्हीसह हॉटेलही फोडून टाकू, अशी धमकीही तो देऊन गेला होता. एक माणूस भर दिवसा सार्वजनिक ठिकाणी येतो आणि धमकी देऊन जातो असे प्रकार बऱ्याच काळानंतर गोव्यात पुन्हा सुरू झाले आहेत.
गोव्यात सुट्टी घालविण्यासाठी आलेले वसईतील हे पर्यटक एकाच परिवारातील होते. ते अत्यंत सभ्य, प्रामाणिक आणि भले माणूस होते, असे ज्या ठिकाणी हे पर्यटक थांबले होते त्या गेस्ट हाऊसच्या मालक मारिया आणि ज्या हॉटेलमध्ये ते नाश्ता घेण्यासाठी गेले होते तेथील कर्मचारीही सांगतात.
गोव्यातील माणसे फार चांगली आहेत. पुन्हा गोव्यात येण्यासाठी फार आवडेल, असे सांगून ही मंडळी परतीच्या वाटेला निघाली होती; परंतु त्यानंतर जे काही घडले त्यामुळे
उभ्या जन्मात पुन्हा गोव्यात येण्याचे धाडस ते करणार नाहीत. तसा संदेशही त्यांनी सोशल मीडियावर टाकला आहे.