गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 09:46 AM2019-01-29T09:46:54+5:302019-01-29T09:57:15+5:30
गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी (28 जानेवारी) राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले.
मडगाव - गोव्यात लाच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न भगत हा दोषी ठरला आहे. सोमवारी (28 जानेवारी) राज्यातील मडगाव येथील दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीक्ष बी.पी. देशपांडे यांच्या न्यायालयाने संशयिताला दोषी ठरविले. 30 जानेवारी रोजी न्यायालय आपला शिक्षेचा निवाडा देणार आहे. काब द राम येथे सहलीसाठी गेले असता दोन युवकांना बुडून मृत्यू आला होता. मृत्यू झालेल्या युवकांसोबत गेलेल्या अन्य युवकांविरुध्द गुन्हा नोंद करु अथवा एक लाख रुपये दयावे अशी मागणी भगत याने त्यांच्या पालकांकडे केली होती. यासंबधी तक्रार नोंद झाल्यानंतर भगत याला सेवेतून निलंबित करण्यात आले होते.
सरकारपक्षातर्फे सरकारी वकील एल. फर्नाडीस यांनी बाजू पाहिली. या खटल्यात एकूण एकवीस साक्षीदार तपासण्यात आले. 7 कलम 13 (2), कलम 13 (ब) भ्रष्ट्राचार प्रतिबंधात्मक कायदयाखाली न्यायालयाने त्याला दोषी ठरविले. लाच प्रकरणाच्या वेळी भगत हा कुंकळळी येथील पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होता.
8 जुलै 2011 रोजी अकरा जणांचा एक गट काब द राम येथे समुद्रकिनारी सहलीसाठी गेला होता. यावेळी झालेल्या दुर्घटनेत नोयल परेरा (17, फातोर्डा ) व सुनील रामचंद्रन (16, नावेली) या दोघांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला होता. तर अजुम खान हा वाचला होता. कुंकळळी पोलिसांनी या घटनेच्या तपास करुन नंतर एल्टन, मंदार, जोनाथन व अमर या मुलांना पोलीस ठाण्यात बोलावून नंतर घरी पाठवून दिले होते. चौकशीच्या निमित्ताने वरील युवकांना पालकांसमवेत पोलीस ठाण्यात येण्यास बजाविले होते. भगत याने पुन्हा एकदा चौकशी केली व नतंर चारही युवकांच्या पालकांना आत बोलाविले. तुमच्या पाल्यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करु असे धमकाविले होते. एल्टन हा अल्पवयीन असल्याने त्याला मेरशी येथे अपना घरात पाठवून देउ असा दम भरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा या युवकांच्या पालकांना आत बोलावून तुम्ही काय निर्णय घेतला आहे असे विचारले होते. या युवकांपैकी एका युवकाच्या वडिलांचा एक पोलीस शिपाई मित्र होता. तो त्याच पोलीस ठाण्यात कामाला होता. भगत याने पैशाची मागणी केली असता, एल्टनच्या वडिलांनी 50 हजार देऊ असे सांगितले होते. मात्र ही रक्कम कमी आहे असे सांगून एक लाख पाहिजे अशी मागणी भगत याने केली होती. नंतर भगत हा कार घेउन पैसे घेण्यासाठी कुंकळळी मार्केटमध्ये आला होता.
जेसन गोयस यांनी मागाहून मडगाव विभागाचे तत्कालीन पोलीस उपअधिक्षक उमेश गावकर यांच्याकडे या लाच संबधी लेखी तक्रार नोंदविली होती. कुंकळळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नेल्सन आल्बुकर्क यांनी मागाहून आपला अहवाल सादर केल्यानंतर दक्षिण गोव्याचे तत्कालीन पोलीस अधिक्षक अॅलन डिसा यांनी भगत याला सेवेतून निलंबित केले होते. खात्या अंतर्गत चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला पुन्हा सेवेत घेण्यात आले होते.