जनतेला सुरक्षा देणारे पोलीस चिखली वसाहतीतच असुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 02:41 PM2018-12-15T14:41:27+5:302018-12-15T14:41:54+5:30

इमारतीत राहणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबांना येथे वास्तव्य करताना सध्या असुरक्षिततेच्या छायेखाली राहणे भाग पडत आहे.

Police protecting the people are insecure in Chikhli colony | जनतेला सुरक्षा देणारे पोलीस चिखली वसाहतीतच असुरक्षित

जनतेला सुरक्षा देणारे पोलीस चिखली वसाहतीतच असुरक्षित

Next

- पंकज शेट्ये
वास्को: चिखली, वास्को येथील पोलीस वसाहतीतील इमारतींची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली असून ह्या इमारतीत राहणाऱ्या पोलीस व त्यांच्या कुटुंबांना येथे वास्तव्य करताना सध्या असुरक्षिततेच्या छायेखाली राहणे भाग पडत आहे. ह्या वसाहतीत असलेल्या सातही इमारती सुमारे चाळीस वर्षांहून अधिक जुन्या असून काही महीन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाने केलेल्या तपासणीत यातील दोन इमारती राहण्यासाठी धोकादायक तर इतर इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट झाले होते. तपासणी करून सुद्धा ह्या इमारतीच्या दुरूस्तीच्या कामाला अजून सुरुवात करण्यात आलेली नसून राहण्यासाठी धोकादायक असलेल्या एका इमारतीत पोलीस कर्मचा-यांची काही कुटुंबे अजूनही राहतात.

चिखली, वास्को येथे असलेल्या पोलीस वसाहतीतील सात इमारतींची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झालेली असून येथील सुमारे ५७ फ्लॅटपैकी ३३ मध्ये पोलीस कुटुंबे राहतात. ह्या इमारती सुमारे ४० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या असून, यात सध्या राहणे धोकादायक असल्याचे येथे भेट दिली असता दिसून आले. ह्या इमारतींना भेगा पडलेल्या असून यापैकी काही इमारतींच्या आतील लोखंडी सळ्या सुद्धा प्लास्टर व सिमेंटचे कपचे पडल्याने दिसतात. पोलिसांची कुटुंबे राहतात असलेल्या काही फ्लॅटमधील ‘सिलिंग’ चे कपचे पडलेले असून भविष्यातही अशा प्रकारच्या घटना घडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त करून यात कोणीही जखमी झाल्यास याला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही इमारतीच्या भिंतीतून मोठी झाडे आलेली असून भिंतीतून पाण्याची गळती, इमारतीच्या आतील भागात वीज वाहिन्या लटकणे अशा विविध प्रकारामुळे येथे राहणा-या पोलीस कुटुंबीयांना धोका तसेच नाहक त्रास निर्माण झालेला आहे. वसाहतीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपे, जंगली झाडे वाढलेली असून त्यांना अनेक काळापासून कापण्यात आलेली नसल्याने येथे साप तसेच विविध जीवाणूंचे प्रमाण वाढलेले असल्याची माहीती सूत्रांनी दिली. सदर वसाहतीत असलेल्या इमारतीतील अनेक ‘फ्लॅट’ च्या खिडकीच्या काचा फुटलेल्या असून यामुळे येथे राहणा-या एका कुटुंबाच्या घरात दोन वेळा धोकादायक जीवाणू सुद्धा घुसले असून वेळेवरच याबाबत जाणीव झाल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.

सुमारे एका वर्षापूर्वी दाबोळीचे आमदार तथा पंचायतमंत्री मविन गुदिन्हो यांनी ह्या पोलीस वसाहतीला भेट देऊन पाहणी केली होती. दुर्दशा झालेल्या इमारतींची दुरुस्ती व गरज पडल्यास इमारती पाडून येथे नवीन इमारती बांधण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना ही दिले होते, मात्र अजून याबाबत काहीच झालेले नसल्याचे दिसून येते. याबाबत माहीती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारत विभागाचे कनिष्ठ अभियंता वामन तळावलीकर यांना संपर्क केला असता ह्या इमारतींची काही काळापूर्वी तपासणी केल्याचे त्यांनी सांगितले. येथे असलेल्या सात इमारतीपैंकी ‘बी२’ व ‘ए४’ राहण्यासाठी असुरक्षित असल्याचे स्पष्ट झालेले असून राहिलेल्या पाच इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे तपासणीत पुढे आल्याची माहीती त्यांनी दिली. याबाबतचा अहवाल काही काळापूर्वी तयार करून विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांना पाठवलेला असल्याची माहीती तळावलीकर यांनी शेवटी दिली. पोलीस नागरिकांना सुरक्षा देण्यासाठी दिवसरात्र काम करतात, मात्र सध्या ह्या वसाहतीत राहणारे पोलीस व त्यांचे कुटूंब सध्या असुरक्षतेच्या छत्राखाली राहत असून भविष्यात त्यांचा जीव धोक्यात न जावा यासाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर पावले उचलण्याची अत्यंत गरज असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

चिखली वसाहतीतील इमारती धोक्यात असल्याची माहीती दिली नाही- पोलीस उपअधीक्षक सुनिता सावंत
चिखली, वास्को येथील पोलीस वसाहतीत असलेल्या सात इमारतीपैंकी दोन राहण्यासाठी धोकादायक आहेत. राहिलेल्या पाच इमारतीची त्वरित दुरूस्ती करणे गरजेचे आहे. स्थितीची सार्वजनिक बांधकाम खात्याने (इमारत विभाग) आम्हाला अजून माहिती दिलेली नाही. ही वसाहत राहण्यासाठी धोकादायक झालेली असल्याचे मला आताच कळले असून याबाबत वरिष्ठ अधिका-यांना त्वरित माहिती देऊन येथे राहत असलेल्या पोलीस कर्मचा-यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी पावले उचलली जाणार असे पोलीस उपअधीक्षक सुनीता सावंत यांनी त्यांना संपर्क केला असता सांगितले.
 

Web Title: Police protecting the people are insecure in Chikhli colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.