गोव्यात चार भिंती आड होवू लागली ड्रग्सची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 10:15 AM2018-12-09T10:15:40+5:302018-12-09T10:21:24+5:30
नेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत.
म्हापसा - नेपाळ तसेच उत्तर भारतातील राज्यांतून गोव्यात येणारे अमली पदार्थ आता गोव्यातच चार भिंती आड किनाऱ्यालगत तयार होवू लागले आहेत. मागील सहा महिन्यांत अशा प्रकारची तीन प्रकरणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली आहेत. पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच विदेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यातील चार जण रशियन नागरिक आहेत.
काही वर्षांपूर्वी गोव्यात येणारे अधिक तर अमली पदार्थ उत्तर भारतातील राज्यातून किंवा नेपाळातून आणला जायचे. त्यातून जास्त प्रमाणावर उत्तर भारतीय पकडले जायचे. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे; पण मागील सहा महिन्यांत तीन अशी प्रकरणे समोर आली आहेत ज्यातून अमली पदार्थाची एक तर लागवड घरातील परसात किंवा घराच्या चार भिंती आडून होवू लागली आहे. यात रसायन युक्त अमली पदार्था सोबत चरस गांजा सारख्या अमली पदार्थाचा त्यात समावेश होतो.
जुलै महिन्यात पोलिसांनी शिवोली भागात केलेल्या कारवाईत दोन रशियन नागरिकांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून १० लाख रुपये किंमतीचे रसायन युक्त अमली पदार्थासोबत चरस व गांजा ताब्यात घेण्यात आले होते. ते भाड्याने रहात असलेल्या फ्लॅटवर धाड घालून ही कारवाई करण्यात आली होती. लागवड अत्यंत गुप्तपणे करताना बाहेर हा प्रकार उघडकीस येवू यासाठी सर्वतोपरी काळजी त्यांच्याकडून घेण्यात आली होती. पोलिसांकडून बराच काळ त्या घरावर पाळत ठेवल्यानंतर ही कारवाई केलेली. पकडण्यात आलेले हे रशियन नागरिक पर्यटन व्हीजावर सतत गोव्यात यायचे.
दुसरी अशाच प्रकारची कारवाई हणजूण पोलीस स्थानकाच्या हद्दीत मागील महिन्यात करण्यात आली होती. हणजूण येथे भाड्याच्या घरात राहणाऱ्या एका ऑस्ट्रीयन नागरिकाने त्यात अमली पदार्थाची प्रयोगशाळा सुरु केली होती. प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारची रसायने पोलिसांनी केलेल्या कारवाईत सापडली होती. गोव्यात येणाऱ्या विदेशी नागरिकांना हेरून तो अमली पदार्थाची विक्री करायचा. पर्यटन हंगामाला सुरुवात झाली की तो गोव्यात दाखल व्हायचा. अंदाजीत १ कोटीच्या आसपास त्याच्याजवळ अमली पदार्थाचे मोठे घबाड सापडले होते. याच संशयितावर २००८ साली त्याच्या मातृभूमीत अशाच प्रकारचा गुन्हा नोंद करुन त्याना अटक करण्यात आली होती.
तिसरी कारवाई हणजूण पोलिसांनी दोन दिवसापूर्वी शिवोली परिसरात केली आहे. त्यात दोन रशियन जोडप्याला अटक केली आहे. त्यांनी सुद्धा याच भागात एक फ्लॅट भाड्याने घेवून अमली पदार्थ तयार करण्याचे काम सुरु केले होते. त्यात अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करताना दोघांकडून सुमारे १५ लाख रुपये किंमतीचा अमली पदार्थ सुद्धा जप्त केला. मागील तीन प्रकरणावरुन गोव्यातही चार भिंती आडून अमली पदार्थाची निर्मिती होण्याचे प्रकार समोर आले आहे. करण्यात आलेल्या तिन्ही कारवाया किनारी भागातून करण्यात आल्या. अशा प्रकारची प्रकरणे म्हणजे गोव्यात बाराही महिने अमली पदार्थ उपलब्ध होण्यामागचे एक कारण असल्याचे मानले जाते.