म्हापशातील खुनाचा पोलिसांनी 48 तासात लावला छडा
By काशिराम म्हांबरे | Published: April 17, 2023 05:55 PM2023-04-17T17:55:14+5:302023-04-17T17:55:28+5:30
म्हापशातील खुनाचा पोलिसांनी 48 तासात लावला छडा लावला.
म्हापसा (गोवा) : येथील नवीन बसस्थानकाच्या बाजूला खुल्या शेतजमिनीत शनिवारी झालेल्या खून प्रकरणाचा छडा म्हापसा पोलिसांनी 48 तासात लावला आहे. एका खाजगी सुरक्षा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या नबीन बी के (32 वय ) खून प्रकरणी संशयित किरण शिंदे ( वय 19 याला अटक केली आहे. गळ्यावर काचेची बाटली खूपसल्याने त्याचा खून झाला होता.
घटना ही १५ रोजी दुपारी ३च्या सुमारास उघडकीस आली. गळ्यावर काचेची बाटली खूपसल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने नबीनचा मृत पावला होता. नबीनच्या गळ्यात काचेचा तुकडा अडकल्याने मोठी जखम झाली होती. त्याशिवाय पोलिसांना मृतदेहाच्या बाजूला एक काचेची दारुची बाटली फोडलेली व बाटलीच्या काचा विखुरलेल्या सापडल्या. तसेच एक बॅकपॅक मयताजवळ सापडली होती. ज्यामध्ये कपडे, मेडिकल रिपोर्टची फाईल व त्याचे ओळखपत्रही सापडले होत. घटनेनंतर पोलिसांनी कलम 302 खाली गुन्हा दाखल केला होता.
तपासासाठी पोलिसांनी श्वान पथकाचा वापर केला होता. तसेच परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले होते. फुटेजच्या आधारावर पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले होते. घटनेच्या दिवशी पहाटे तुमच्या दरम्यान मयत एका संशयित व्यक्तीबरोबर फिरत असताना ते आढळून आले होते. संशयिताला अटक करण्यासाठी पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. शेवटी 48 तासाच्या तपासानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान संशयिताने आपल्या गुन्ह्याचे कबुली दिली आहे. खुनाच्या वेळी संशयिताने वापरलेले तसेच रक्ताचे डाग असलेले कपडे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दारूच्या नशेत हा खुनाचा प्रकार घडल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. पुढील तपास निरीक्षक परेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आला आहे.