पोलीस स्थानकांत हवा बाल तक्रार विभाग

By admin | Published: August 23, 2015 02:04 AM2015-08-23T02:04:34+5:302015-08-23T02:04:34+5:30

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा

In the Police Stations Air Child Report Department | पोलीस स्थानकांत हवा बाल तक्रार विभाग

पोलीस स्थानकांत हवा बाल तक्रार विभाग

Next

पणजी : राज्यात अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात गुन्हा नोंद करण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकात खास बाल तक्रार विभाग स्थापन करण्यात यावा, अशी मागणी कळंगुट बाल ग्राम समितीच्या बैठकीत झाली. राज्यातील समुद्रकिनारी परिसरात मोठ्या प्रमाणात बालमजुरी चालते. यात परप्रांतीय मुलांबरोबरच स्थानिक मुलांचाही समावेश आहे.
बालमजुरी करून घेणे हा गुन्हा असला तरी कळंगुट, कांदोळीसारख्या समुद्रकिनारी परिसरात मोठमोठ्या हॉटेल, मसाज पार्लर, शॅक्स येथे सर्रासपणे अल्पवयीन मुले काम करताना आढळतात. काही मुलांकडून केवळ मजुरी करून घेतली जात नाही, तर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार, शारीरिक अत्याचारही केले जातात. आर्थिक परिस्थितीने कमजोर असलेली मुले मोठी रक्कम मिळते, या आशेने मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करण्यास तयार होतात. गांभीर्याची बाब म्हणजे अशा कामात केवळ परप्रांतीयांची मुले नव्हे, तर स्थानिक मुलांचाही समावेश असल्याचे सीआरजी संस्थेच्या निदर्शनास आले आहे.
सीआरजी संस्थेतर्फे कांदोळी, कळंगुट परिसरात घेतलेल्या बाल ग्राम समितीत पोलीस अधिकारी, सामाजिक संस्थेचे सदस्य, पंचायतीचे सदस्य असून मुलांना एका व्यासपीठावर आपल्या समस्या, सूचना मांडण्याची मुभा देण्यात येते.
समाजकार्यकर्ते एकनाथ नागवेकर म्हणाले, या परिसरात बालमजुरी थांबविण्यासाठी विविध स्तरांवर जागृती करण्याची गरज आहे. यात पोलिसांची मदत महत्त्वपूर्ण ठरेल. प्रत्येक शॅक, हॉटेल, मसाज पार्लर, गाडे यावर बालमजूर दिसल्यास मालकाला दंड आकारण्याचा नियम सुरू करण्याची गरज आहे, अशी सूचना त्यांनी केली.
‘सेव्ह कळंगुट’ संस्थेचे नितेश चोडणकर म्हणाले, पैशांची कमतरता असल्याने काही मुले मसाज पार्लर, हॉटेलमध्ये काम करतात. यात स्थानिक मुलेही असतात. काही मुले सकाळी शाळा आणि संध्याकाळी मजुरी करतात. ही बालमजुरी रोखण्यासाठी पोलिसांनी मालकांना सूचना देणे आणि वेळ पडल्यास दंड आणि कारवाई करण्याची मोहीम सुरू करणे आवश्यक आहे. समुद्रकिनाऱ्यावर भीक मागणाऱ्या मुलांच्या संख्येतही वाढ होत आहे. पर्यटन हंगाम जवळ आल्यानंतर त्यात लक्षणीय वाढ होते. त्याला आवर घालण्यासाठीही समाजिक संस्थांबरोबर पोलिसांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. कळंगुट, कांदोळी परिसर हा पर्यटकांमुळे नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात बालमजुरी आणि बाल अत्याचार यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. मात्र, काही प्रकरणे नोंद होत नसल्याने ती कळत नाहीत. मुलांवरील अत्याचार रोखण्यासाठी पर्यटकांना हॉटेल किंवा घरे भाड्याने देणाऱ्या मालकांनीही बाल सुरक्षा जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचा सूर बैठकीत उमटला. सीआरजीच्या सुषमा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. (प्रतिनिधी)

Web Title: In the Police Stations Air Child Report Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.