शिरोडा येथे सहा दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश
By आप्पा बुवा | Published: June 15, 2023 06:01 PM2023-06-15T18:01:39+5:302023-06-15T18:01:51+5:30
सहा दिवसांपूर्वी शिरोडा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चोराना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले.
फोंडा - सहा दिवसांपूर्वी शिरोडा येथे झालेल्या घरफोडी प्रकरणी चोराना पकडण्यात फोंडा पोलिसांना यश आले असून, त्यांनी चोरलेले नऊ लाखाचे दागिने व रोख वीस हजार सुद्धा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
सविस्तर पुरतानुसार 9 जून रोजी पाजीमळ शिरोडा येथील रसिका प्रशांत पैगिंटकर यांनी आपल्या घरात चोरी झाल्या संबंधित तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी साडेदहा ते रात्री साडेबाराच्या दरम्यान घरात कोणी नाही ते पाहून चोरट्यानी दरवाजा फोडून आत प्रवेश केला.
रसिका यांच्या शेजारणीने काही दिवसापूर्वीच आपले दागिने ठेवण्यासाठी त्यांच्याकडे दिले होते. सदरच्या नऊ लाखाच्या दागिण्यावर चोरट्यानी डल्ला मारला. त्याच बरोबर घरात असलेले वीस हजाराची रोख घेऊन त्यांनी पोबारा केला होता. परिसरात असलेल्या तांत्रिक गोष्टीच्या आधारे पोलिसांनी यासंबंधी तपास सुरू केला होता. काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी त्या भागात एक अज्ञात जोडपे पांढऱ्या दुचाकी वरून परिसरात फिरत होते. पोलिसांनी सुरुवातीला त्या गाडीचा छडा लावायचे ठरवले .तपास चालू असताना सदरची गाडी मडगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिस अगोदर गाडी व नंतर त्या गाडीच्या आधारे चोरट्यापर्यंत पोहोचले. पोलीसांनी हिसका दाखवताच दोन्ही चोरट्यानी आपला गुन्हा लगेचच कबूल केला.
सदर घरफोडी प्रकरणी गॅबी पावलू फर्नांडिस (वय 25, राहणार सावर्डे), शबनम रियाज अहमद सय्यद( राहणार नावेली, वय 24) या दोघांना पोलिसांनी लगेचच संशयित म्हणून ताब्यात घेतले.
पोलीस स्थानकात आल्यानंतर त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यानी मोहम्मद कासिम उर्फ दीपक याचे सुद्धा नाव घेतले. त्याचा सहभाग सदर चोरीत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला सुद्धा ताब्यात घेतले आहे .
चोरलेले नऊ लाखाचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलीस उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, आदित्य नाईक गावकर, यांच्याबरोबर पोलीस केदार जल्मी, अमेय गोसावी, आदित्य नाईक यांनी या संदर्भात चांगली कामगिरी बजावली. फोंडा स्थानकाचे उपअधीक्षक आशिष शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी सदर सदरच्या चोरीप्रकरणी तपास यंत्रणेला योग्य ते मार्गदर्शन केल्याने सदर गुन्ह्याचा छडा लागू शकला.