गाडीच्या टिंटेड काचा पोलीस करणार साफ; बालिका अपहरण प्रकरणानंतर विधानसभेत निर्णय
By वासुदेव.पागी | Published: February 7, 2024 02:34 PM2024-02-07T14:34:28+5:302024-02-07T14:34:48+5:30
केरी सत्तरी येथील ९ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा झालेल्या प्रयत्नामुळे गोवा हादरले होता.
पणजीः कारगाड्या व इतर गाड्या ज्या काचा काळा करून फिरतात त्यांच्यावर केवळ दंडात्मक कारवाई करून थांबणार नाही तर काचा काळ्या करण्यासाठी करण्यात आलेले लेमिनेशन पूर्णपणे काढून टाकले जाईल. केरी- सत्तरी येथील शाळकरी मुलीचे अपहरण करण्याच्या प्रकरणामुळे हा निर्णय बुधवारी गोवा विधानसभेत घेण्यात आला.
केरी सत्तरी येथील ९ वर्षे वयाच्या शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा झालेल्या प्रयत्नामुळे गोवा हादरले होता. या मुलीने धाडस दाखवून अपहरणकर्त्याच्या हाताचा जावा घेऊन आपली सुटका करून घेतली होती. बुधवारी आमदार दिव्या राणे यांनी लक्ष्यवेधी सूचना करताना हा मुद्दा उपस्थित केला. अपहरणकर्ते काळ्या काचांच्या कारमध्ये आले होते, त्यामुळे त्यांची ओळख मिळू शकली नव्हती. त्यामुळे राणे यांनी अशा काळ्या काचा वापरणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला.
त्यावर आमदार दिगंबर कामत यांनी या मुद्द्यावर बोलताना अशा काळ्या काचांच्या गाड्यांचे लेमिनेशन पूर्णपणे फाडून का टाकले जात नाही असा प्रश्न केला. केवळ दंड आकारुन थांबू नका तर काळ्याकाचा ठेऊन नका अशी सूचना त्यांनी केली. यात आम आदमी पार्टीचे आमदार वेन्जी विएगश यांनी सूचना करताना काळ्या काचांच्या गाड्या वापरणाऱे आमदार आणि माजी आमदार मंत्री यांच्यापासून कारवाईची सुरूवात करा असे सांगितले. कुणालाही सोडू नका असेही सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावर उत्तर देताना या या सूचनेची त्वरित अंमलबजावणी सुरू केली जाणार असल्याचे सांगितले. केवळ दंडात्मक कारवाई करून न थांबण्याचा आणि लेमिनेशन उखडून टाकण्याच्या सूचना दिल्या जातील असे त्यांनी सांगितले. काळ्या काचांवर कारवाई करण्याबरोबरच आमदार दिव्या राणे यांनी आणखीही सूचना केल्या होत्या. त्यात शाळांतील विद्या्र्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कँमरे व इतर खबरदारी घेण्याच्या सूचना ज्या शिक्षण खात्याने केल्या होत्या त्याच्या अंमलबजावणीची खातरजमा करून कुणी घ्यावी या संतर्भात जबाबदारी निश्चित करण्मयात यावी असेही त्यांनी सांगितले.