डयुटीवरील पोलिसांना मारहाण, एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:33 PM2019-01-27T17:33:31+5:302019-01-27T17:44:12+5:30
सेवा बजावत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
मडगाव - सेवा बजावत असताना एका पोलीस कॉन्स्टेबलला मारहाण करण्यात आल्याची घटना गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हयातील मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी रिस्टन आलेक्झांडर डिसोझा (24) या संशयिताला अटक केली आहे. सनी खुशाली शेट देसाई (32) हे तक्रारदार आहेत. संशयिताविरुध्द भारतीय दंड संहितेच्या 535, 506 व सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायदा कलम 3 अंर्तगत गुन्हा नोंद केला आहे.
मायणा-कुडतरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वेरोनिका कुतिन्हो पुढील तपास करीत आहेत. 26 जानेवारी रोजी दुपारी 2 .25 वाजता वरील घटना घडली. रोबर्ट 61 वर तक्रारदार आपली डुयटी करीत होता. पणजी पीसीआरमधून आलेल्या एका कॉलनुसार घटनास्थळी जात असताना संशयित डिसोझा याने त्याला अटकाव करुन मारहाण केली. त्याला कोयत्याचा धाक दाखवून नंतर धमकीही देण्यात आली तसेच रॉबर्ट व्हेनची मोडतोडही केली. मागाहून या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केल्यानंतर पोलिसांनी संशयिताला अटक केली. याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.