मृत्युशय्येवर गोवा!... तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 05:08 PM2018-10-20T17:08:46+5:302018-10-20T17:09:42+5:30

एक मरणासन्न, अखेरचे आचके देणारे राज्य असलेले गोवा आणि गोमंतकीय स्वत:चे आणखी अध:पतन करून घेतील आणि देशभरात विनोदाचा विषय बनतील, असे कधी वाटले नव्हते.

Politiacl Instability In Goa | मृत्युशय्येवर गोवा!... तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात

मृत्युशय्येवर गोवा!... तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात

googlenewsNext

- डॉ. ऑस्कर रिबेलो

एक मरणासन्न, अखेरचे आचके देणारे राज्य असलेले गोवा आणि गोमंतकीय स्वत:चे आणखी अध:पतन करून घेतील आणि देशभरात विनोदाचा विषय बनतील, असे कधी वाटले नव्हते. मात्र, अहो आश्चर्यम्! या राज्याने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. कौतुकास्पद अशीच ही कामगिरी!!

तशी इथली जनता नैतिक दिवाळखोरी जाहीर केलेली. २०१७च्या निवडणुकीत आम्ही स्वत:चीच विक्री करून बसलो. आणि आता लाज-भीड न ठेवता सध्याच्या तथाकथित गंभीर राजकीय परिस्थितीचे विच्छेदन उसन्या गांभीर्याने करत आपल्याच पेंगलेल्या नजरेसमोर चाललेल्या तमाशाला सहन करतो आहोत. यातूनही काही चांगले निघेल, हा आपला आशावाद! याला विनोद म्हणायचे नाही तर काय?

आमच्या समोर जो तमाशा चालला आहे, त्याचे संक्षिप्त वर्णन असे करता येईल:

एक राजा व्याधीने ग्रस्त आणि त्रस्त आहे, तरीही त्याला सत्तेचा मोह सुटत नाही. त्याचे रंध्रन् रंध्र स्वार्थी राजकारणाने लडबडलेले आहे, तिथे मुत्सद्देगिरीचा लवलेशही नाही. त्याच्याप्रमाणेच व्याधीग्रस्त असलेल्या दोन मंत्र्यांच्या हाती नारळ दिलाय (याला भूतदया म्हणायचे का?) त्यामुळे सहकारी पक्ष आणि स्वकीयांतली गिधाडे जागी होऊन घिरट्या घालायला लागली आहेत. ‘दैवी’ अधिष्ठान असलेल्या या पक्षाच्या उभारणीसाठी सर्वस्व देणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्या जखमांवर पर्यायी औषधांसह स्व-उपचार करण्यासाठी तसेच सोडून देण्यात आले आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता प्रसारमाध्यमेही ही नौटंकी आणि तिच्यायोगे आपले संविधान व लोकशाहीची चाललेली विटंबना मुक्याने पाहताहेत.

नौटंकी जोशात चालू आहे आणि आपण तोंड आ वासून पाहातो आहोत; इतकेच नव्हे तर एखादा परिचयाचा चेहरा रंगमंचाच्या मध्यावर आला तर त्याचा टाळ्यांनी जयजयकारही करतो आहोत!!

आमच्या समस्यांचाही आम्हाला विसर पडलाय, कचरा, पाणीटंचाईची समस्या दृष्टीआड गेलीय. पर्यावरणाचा विध्वंस किंवा भ्रष्टाचाराचा वडवानल आम्हाला विचलित नाही करू शकत. अर्थव्यवस्थेला मारू दे झक... आमच्या सांस्कृतिक वारशाला क्षद्मराष्ट्रीयत्व आणि जागतिकीकरणाने गुंडाळले तरीही हरकत नाही! आमच्या अस्तित्वाशी संबंध असलेल्या विषयांच्या बाबतीतही आम्ही अनासक्त आहोत. आम्हाला स्वारस्य आहे ते राजकीय पटलावर चाललेल्या शर्मनाक नौटंकीत. केवळ स्वत:च्या समाजातल्या सत्ताकांक्षी नेत्यांच्या लालसेचे इंगळे फुलते राहावेत यासाठी टाळ्या पिटणे आणि इतर समाजातल्या नेत्यांची पीछेहाट पाहून त्यांची टर उडवणे यावरच आम्ही समाधानी आहोत. अन्य राजकीय संघटनांच्या सच्छील नेत्यांची आणि निर्लस कार्यकर्त्यांची केवळ टर उडवणे आणि निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव करण्यात समाधान मानणे, हीच आमची राजकीय पोच. तसे करून झाल्यावर मात्र आम्ही थोडा पश्चात्ताप करतो, एखादे भावनिक आवाहन असलेले गीत ऐकून गोव्यासाठी दोन अश्रू ढाळतो किंवा मद्याचा प्याला रिता करत आपले राज्यावर अजूनही प्रेम असल्याचे स्वत:लाच बजावत बसतो.

नौटंकीतल्या तमाम जोकर्सना आम्हीच स्वेच्छेने, विचारपूर्वक निवडून दिलेय आणि त्यायोगे आमच्या राज्याला मृत्युशय्येवर ढकललेय, हे जोपर्यंत आम्ही कबूल करणार नाही, तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. ते कदापि शक्य नाही!

पण, मुळात गोव्याला वाचवायचे प्रयोजन आहे का? की आपण स्वत:चीच तशी समजूत करून घेतली आहे? गोव्याचे बंगळुरू किंवा पुणे किंवा सिंगापूर-दुबई व्हावे आणि पैशांच्या प्रपातात संस्कृती-वारशाने वाहून जावे, असेच तर गोमंतकीयांना वाटत नाही ना?

मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा, मित्रांनो! राजकारण्यांना दोष देणे सोपे असते; पण आज जो मरणासन्न गोवा दिसतोय ना, तो केवळ त्यांच्यामुळे झालेला नाही. हा एकेकाळी जगाच्या अप्रुपाचा विषय असलेल्या; पण कालौघात पूर्वग्रहांच्या अतिरेकामुळे आपले मानसिक संतुलन गमावून बसलेल्या आणि आत्मग्लानीप्रत आलेल्या तमाम गोवेकरांचा सामूहिक आत्मघात आहे!

(लेखक गोव्यातील सामाजिक आंदोलनाचे नेते आहेत.)
 

Web Title: Politiacl Instability In Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा