फोंड्यात राजकीय खळबळ; भाटीकर-मुख्यमंत्री भेटीने सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 08:57 AM2023-05-12T08:57:09+5:302023-05-12T08:58:18+5:30
डॉ. केतन भाटीकर यांनी फोंड्यातील विकासासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा : मगोपचे युवा नेते डॉ. केतन भाटीकर यांनी रायझिंग फोंडाच्या चार नगरसेवकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने येथील राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ माजली आहे. या संदर्भात सोशल मीडियावर तर्कवितर्क व्यक्त होत आहेत. मात्र डॉ. केतन भाटीकर यांनी फोंड्यातील विकासासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचा दावा केला आहे.
गुरुवारी डॉ. भाटीकर हे आपले चार व त्यांना पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार व्यंकटेश नाईक यांना घेऊन पणजीत मुख्यमंत्र्यांना भेटले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी रायझिंग फोंडाच्या सर्व नगरसेवकांचे कौतुक केले. तसेच पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
याबाबत डॉ. भाटीकर यांनी सांगितले की, फोंड्याच्या विकासाचे आपण स्वप्न पाहिले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इतर काही मंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत. समाजकार्य करत असताना सत्ता स्थानी असलेल्या लोकांचे सहकार्य हे लागतेच. आमचे नगरसेवक निवडून आले आहेत, त्या प्रभागाचा विकास आम्हाला करायचा आहे. इतर क्षेत्राचाही समतोल विकास साधायचा आहे. फोंड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले.
सुदिनच आमचे नेते : भाटीकर
नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी भरणार का, या संदर्भात डॉ. केतन भाटीकर म्हणाले की, सुदिन ढवळीकर यांना आम्ही नेता मानतो. या संदर्भात जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय ते घेतील. विकासासाठी सुदिन ढवळीकर यांचे देखील सहकार्य आम्हाला हवे आहे. आजपर्यंत राजकारणात मी जो कोणी आहे त्याचे संपूर्ण श्रेय हे सुदिन ढवळीकर यांनाच जाते. त्यामुळे यापुढे जे काही करायचे आहे त्याचे निर्णय सुदिन ढवळीकर हेच घेतील.