Goa Election 2022: विशेष लेख: आमदारांची मस्ती जिरेल...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 02:30 PM2022-02-06T14:30:57+5:302022-02-06T14:33:37+5:30

Goa Election 2022: अनेक प्रस्थापित राजकारण्यांचे अंदाज यावेळच्या निवडणुकीत चुकणार आहेत.

political situation before goa election 2022 and its consequences | Goa Election 2022: विशेष लेख: आमदारांची मस्ती जिरेल...

Goa Election 2022: विशेष लेख: आमदारांची मस्ती जिरेल...

Next

-सदगुरू पाटील

अनेक प्रस्थापित राजकारण्यांचे अंदाज यावेळच्या निवडणुकीत चुकणार आहेत. नऊ पक्ष रिंगणात आहेत. 301 उमेदवार भवितव्य आजमावत आहेत. यापैकी ३० टक्के उमेदवार हे गंभीर नाहीतच, ते केवळ दुसऱ्याची मते फोडण्यासाठी उभे राहिले आहेत.  50 टक्के उमेदवार हेच एकमेकांविरुद्ध टक्कर देत आहेत. 20 टक्के उमेदवार कागदोपत्रीच आहेत. त्यांची नावे देखील मतदारांना ठाऊक नाहीत. 40 टक्के राजकारणी जास्त पैसा खर्च करत आहेत. मतदार भडकलेला आहे. तो काही राजकारण्यांची मस्ती जिरवणार आहे.

त्तर आणि दक्षिण गोव्यातील अनेक विधानसभा मतदारसंघांमध्ये गेले काही दिवस फिरण्याची संधी मिळाली. काही मतदारसंघांतील अगदी अंतर्गत भागात, ग्रामीण भागात तर काही मतदारसंघांतील शहरी भागात जाता आले. अनेक युवकांच्या मनात नेमके काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करता आला. कुणाला निवडून द्यायचे व कुणाला पराभूत करायचे हे मतदारांनी ठरवलेले आहे. महिलांची मते ही प्रत्येक मंत्री, आमदाराला आपली हक्काची मते वाटतात. स्वयंसाहाय्य गटांना, काही महिला मंडळांना, काही महिला संस्थांना हाताशी धरून राजकारणी आपले डाव खेळत आहेत. ठरावीक रक्कम महिला संस्थांना दिली, की आपल्याला मते मिळतात हा काही प्रस्थापित राजकारण्यांचा समज यावेळच्या निवडणुकीत खोटा ठरणार आहे. ग्रामीण भागात महिलांना पैसे दिले की त्या सभेला गर्दी करतात, बैठकांना येतात, हे सगळे खरे आहे; पण मत कुणाला द्यायचे व कुणाला नाही, हे महिलांनीही ठरवलेले आहे. आमच्या मुलांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत, आमच्या मुलांनी आमदारांच्या घरी खूप खेपा मारल्या पण नोकरी नाहीच. 

आता घरी दोन हजार रुपयांचे पाकिट पाठवून दिले म्हणून आम्ही मत देणार असे काही नाही, असे दोघा महिलांनी सांगितले. काही राजकारण्यांनी हळदी कुंकू सोहळ्यांचा यावेळी वापर केला. महिलांना साड्या वाटल्याच, पण तिसवाडीतील एका राजकारण्याने साड्यांसोबत पाचशे रुपयांचे पाकिटही वाटले. मात्र तरीही महिला वर्गावर प्रभाव पडलेला नाही. सांतआंद्रेमध्ये आमदार फ्रान्सिस सिल्वेरा हे एका मतदाराच्या घरी जातात. तिथे घरातील महिला थेट नोकरीविषयी विचारते. ती संतप्त होऊन प्रश्न करते. कितीवेळा तुमच्या घरी आलो आम्ही, पण आमच्या मुलांची कामे झाली नाहीत असे ती महिला थेट सांगते. थिवी मतदारसंघात नीळकंठ हळर्णकर यांना लोक थेट प्रश्न विचारतात. कोविड संकट काळात तुम्ही कुठे होता, असे एकाने विचारले. सिल्वेरा, हळर्णकर, सोपटे अशा अनेक आमदारांविषयीचे व्हीडिओही व्हायरल झाले आहेत.

वाड्यावर किंवा घरी आलेल्या राजकारण्यांना थेट प्रश्न विचारण्याचे धाडस मतदारांना झालेले आहे. लोकांना हे धाडस आले, कारण काही राजकारण्यांनी गेल्या पाच-दहा वर्षांत खूप मस्ती केली आहे. गुर्मीने वागलेत काहीजण. काही मंत्री तर युवकांना क्रीडा स्पर्धांसाठी पैसे दिले की आपले काम झाले असे समजत आले. क्रिकेट, फुटबॉलच्या स्पर्धांची बक्षिसे पुरस्कृत करणारे राजकारणी तिसवाडी, बार्देश, सासष्टीत खूप आहेत. मात्र क्रीडा स्पर्धा पुरस्कृत केल्या म्हणजे आपण जिंकणार, हा भ्रमाचा भोपळा यावेळी फुटणार आहे. सर्वच मतदारांना गृहीत धरता येत नाही. तुम्ही पाच-दहा वर्षे आपल्याशी कसे वागला, तुमचे बोलणे-चालणे कसे होते, तुम्हाला गर्व झाला होता की नाही, सत्तेचा माज चढला होता की नाही या सगळ्याचा विचार लोक करतात. काही आमदारांनी मतदारसंघांमध्ये सुडाचे राजकारण केले. सरकारी कर्मचाऱ्यांच्या मुद्दाम दूरवर बदल्या केल्या. यामुळे लोकांच्या मनात काही राजकारण्यांविषयी कडवट भावना आहे. मतदानाद्वारे राग व्यक्त करण्यासाठी काही मतदारसंघांमधील लोक थांबले आहेत. त्यांना येत्या १४ तारखेची प्रतीक्षा आहे.

पणजी मतदारसंघात एक-दोन ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत. तेथील युवकांच्या क्रीडा स्पर्धांवेळी बाबूश मोन्सेरात सगळी बक्षिसे पुरस्कृत करतात. मात्र यावेळी पणजीत वेगळे वातावरण तयार झाले आहे. लढत एकतर्फी नाही. उत्पल पर्रीकर रिंगणात असल्याने मतदारसंघात भावनिक वातावरण तयार झाले आहे. स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या पुत्राला या सहानुभूतीचा लाभ उठविता येईल का, हे पाहावे लागेल. एल्वीस गोम्स हे पणजीतील काँग्रेसचे उमेदवार उच्चशिक्षित ख्रिस्ती मतदारांची मते प्राप्त करतील. ताळगावमध्ये मंत्री जेनिफर मोन्सेरात लोकांच्या जास्त संपर्कात नव्हत्या, त्या आपल्याला भेटत नव्हत्या; असे अनेकजण सांगतात. ताळगावमध्ये काँग्रेसतर्फे टोनी रॉड्रिग्ज लढत आहेत. टोनीचे सामाजिक काम आहेच, शिवाय त्यांना माजी महापौर उदय मडकईकर हेही मदत करत आहेत. पाहूया टोनी कुठपर्यंत मजल मारतात ते. मात्र जेनिफरसाठी आव्हानात्मक स्थिती आहे एवढे नक्की.

सत्तरीपासून पेडणे तालुक्यापर्यंत आणि काणकोणपासून पणजी ते मुरगावपर्यंत विविध राजकारण्यांना सध्या घाम फुटलेला आहे. ही निवडणूक सोपी नाही याचा अनुभव बहुतेकांना येत आहे. यात सर्वपक्षीय उमेदवार आहेत. केवळ एकाच पक्षातील राजकारणी आहेत असे नाही. आपण आयुष्यभर या मतदारसंघात जिंकणार आहोत असा काहीजणांचा समज होता. मतदार हा समज येत्या १४ रोजी खोटा ठरवणार आहेत. काही प्रस्थापित राजकारण्यांची मस्ती जिरेल. काही नवे चेहरे गोवा विधानसभेत पोहोचतील. येत्या मार्चमध्ये जी विधानसभा अधिकारावर येईल, त्या विधानसभेत आप, तृणमूल यांचेही प्रत्येकी दोन आमदार असू शकतात. शिवाय दोन अपक्ष आमदारही विधानसभेत पाहायला मिळतील. काही विद्यमान आमदार पराभूत होतील. २०१७ साली जे पराभूत झाले होते, त्यापैकी काहीजण आता विजयी होतील. मतदारसंघांचा कानोसा घेतल्यानंतर एवढे नक्कीच कळून येते.
 

Web Title: political situation before goa election 2022 and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.