गोव्याचे तीन आमदार विदेशात तर दोन गोव्याबाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2018 12:28 PM2018-10-03T12:28:36+5:302018-10-03T12:43:13+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी झाल्यापासून मंत्र्यांचे विदेश दौरे तसेच गोव्याबाहेरील दौरे सुरुच आहेत.
पणजी - मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी झाल्यापासून मंत्र्यांचे विदेश दौरे तसेच गोव्याबाहेरील दौरे सुरुच आहेत. दर महिन्याला एक किंवा दोन मंत्री किंवा आमदार विदेशात जाऊन येतात. काहीजण गोव्याबाहेर दोन किंवा तीन दिवसांचा मुक्काम करून येतात. यामुळे गोव्याच्या प्रशासनाची सगळी सुत्रे सध्या आयएएस अधिकाऱ्यांच्याच हाती गेली आहेत.
गेल्या बुधवारी मंत्रालयात बहुतेक मंत्री एकत्र जमले होते. त्यावेळीही तीन मंत्री गोव्याबाहेर असल्याने या बैठकीला येऊ शकले नव्हते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गोव्यात नसले तरी, अशा प्रकारे मंत्री एकत्र येऊन चर्चा करण्याचा प्रकार प्रथमच घडला होता. मुख्यमंत्री दिल्लीतील रुग्णालयात असले तरी, आता आम्ही दर बुधवारी एकत्र येऊ व काही प्रस्तावांविषयी चर्चा करू आणि अर्थसंकल्पीय आश्वासनांची पूर्तता करू, असे मंत्री विजय सरदेसाई व इतरांनी जाहीर केले होते. तथापि, मंत्री सरदेसाई हे सध्या दिल्लीत आहेत. दोन दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. ते दिल्लीतील एम्समध्ये मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही भेटून आले. त्यांच्यात राजकीय स्वरुपाची चर्चा झालेली असून पुढील काही दिवसांत महत्त्वाच्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पर्रीकर हे ऑक्टोबरच्या अखेरीस गोव्यात परततील असे काही मंत्र्यांनी लोकमतला सांगितले.
मच्छीमार खात्याचे मंत्री विनोद पालयेकर हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते येत्या 10 ऑक्टोबरला गोव्यात परततील. आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे सिंगापुरला गेले आहेत. ते पुढील आठवड्यात गोव्यात परततील अशी माहिती सुत्रांकडून मिळाली. भाजपाचे ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा हेही अजून अमेरिकेत आहेत. ते 15 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात परततील. भाजपाचे आमदार मायकल लोबो हे आठ दिवस लंडनच्या दौऱ्यावर गेले होते. कालच ते गोव्यात परतले आहेत. कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे हेही गोव्याबाहेर आहेत. दरम्यान, प्रशासनाचा बहुतांश भार हा आयएएस अधिकाऱ्यांनीच घेतला आहे. मुख्य सचिव धमेंद्र शर्मा व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील प्रधान सचिव कृष्णमूर्ती हे फोनवरून मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या संपर्कात असतात. पर्रीकरच्या सूचनेनुसार ते पुढील कामे करतात.