गोव्यात राजकीय गोंधळ; सरकारमध्ये पर्यायी नेतृत्वाची चर्चा, पर्रीकर पुन्हा अमेरिकेला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2018 07:07 PM2018-08-29T19:07:37+5:302018-08-29T19:16:36+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्याचे प्रशासन सक्रिय करण्याच्या हेतूने गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोवा भाजपची कोअर टीम गरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गोव्यातील राजकीय स्थिती मांडणार आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्याचे प्रशासन सक्रिय करण्याच्या हेतूने गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोवा भाजपची कोअर टीम गरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर गोव्यातील राजकीय स्थिती मांडणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे अत्यंत आजारी असून त्यांना तिस-यांदा उपचारांसाठी अमेरिकेत जावे लागत आहे.
गोवा सरकारमधील सगळेच मंत्री सध्या अस्वस्थ आहेत. राजकीय स्थिती अस्थिरतेची बनू लागली आहे. अगोदरच सरकारमधील दोन मंत्री इस्पितळात आहेत. ते कधी बरे होऊन परत येतील हे कुणाला ठाऊक नाही. त्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सुद्धा आजारी आहेत. ते न्यूयॉर्क अमेरिकेमधील स्लोन केटरींग स्मृती इस्पितळातून दुस-यांदा उपचार घेऊन नुकतेच परतले होते. मात्र, त्यांना पुन्हा मुंबईतील लिलावती इस्पितळात दाखल व्हावे लागले. आता मुंबईहून ते पुन्हा अमेरिकेला उपचारांसाठी निघाले. मुख्यमंत्री अमेरिकेहून परत कधी येतील याची कुणालाच खरी कल्पना नाही. ते आठवडय़ानंतर येतील असे सांगून फक्त भाजपा कार्यकर्त्यांची समजूत काढली जात आहे. गोवा सरकारमधील मंत्री यामुळे सैरभैर झाले आहेत. विद्यमान सरकारमध्ये भाजपाकडे फक्त 14 आमदार असून त्यापैकी तिघे गंभीर आजारी आहेत. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि तिघे अपक्ष यांच्याच आधारावर विद्यमान सरकार टिकून आहे. मुख्यमंत्री वारंवार आजारी होऊ लागल्याने व त्यांचे अनेक दिवस इस्पितळांमध्ये उपचारांसाठीच जाऊ लागल्याने गोव्यातील भाजपही चिंताग्रस्त बनला आहे. नेतृत्वाबाबत पर्यायी व्यवस्था आता करावी लागेल, कारण लोक प्रशासन ठप्प झाल्याची टीका सर्वबाजूंनी करत असल्याची कल्पना भाजपामधील अनेक जबाबदार पदाधिका-यांना आली आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना पत्रकारांनी बुधवारी याविषयी विचारले असता, त्यांनी पक्षश्रेष्ठींनी लवकर योग्य तो निर्णय घेण्याची गरज आहे असे मत मांडले. लोकांच्या टीकेची पक्षाला कल्पना आहे, असे ते म्हणाले.
लवकर निर्णय व्हावा - श्रीपाद नाईक
मुख्यमंत्र्यांना मुंबईत भेटण्यासाठी भाजपची कोअर टीम बुधवारी सायंकाळी रवाना झाली. र्पीकर यांच्याशी चर्चा करून तिथून ही टीम दिल्लीला निघणार आहे. श्रीपाद नाईक यांना याविषयी पत्रकारांनी बुधवारी विचारले असता, ते म्हणाले की गुरुवारी दिल्लीत भाजपा पक्षश्रेष्ठींना भेटून गोव्याची राजकीय स्थिती मांडली जाईल. काही तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी. लवकर करायला हवी. आम्ही स्थिती भाजपच्या अध्यक्षांसमोर मांडू. शेवटी निर्णय घेणो हे श्रेष्ठींच्या हाती आहे. जो काही निर्णय होईल तो आम्ही गोव्यातील सत्ताधारी आघाडीमधील घटक पक्षांना कळवू.
अनेक मंत्री आजारी असल्याने प्रशासनावर परिणाम झालाय व लोक टीका करत असल्याविषयी काय वाटते असे पत्रकारांनी विचारले असता, पक्षाला याची कल्पना आहे व त्यामुळेच पर्यायी व्यवस्था व्हावी असे श्रीपाद नाईक म्हणाले. तुम्हाला पुन्हा गोव्याच्या राजकारणात पक्षाने बोलावले तर तुम्ही काय कराल असे नाईक यांना विचारले असता, आपण पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक आहे व पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडीन. यापूर्वीही मी पक्षाचे ऐकत आलो आहे, असे नाईक म्हणाले.
कोअर टीमची चर्चा
दरम्यान, सायंकाळी भाजपच्या कोअर टीमने मुंबईत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली. विविध विषयांवर मनोहर पर्रीकर यांच्याशी राजकीय चर्चा झाली. आपण एक आठवडय़ाच्या आत अमेरिकेहून गोव्यात परतेन, असे मनोहर पर्रीकर यांनी आम्हाला सांगितले. त्यामुळे आम्ही दिल्लीला जाणार नाही. श्रीपाद नाईक हे पक्षाध्यक्ष शहा यांना दिल्लीला भेटतील. कारण नाईक हे 31 रोजी नेदरलँडच्या दौ-यावर जात आहेत, असे कोअर टीमच्या दोघा सदस्यांनी लोकमतला सांगितले. मनोहर पर्रीकर आमच्याशी बोलले तेव्हा आम्हाला ते ठीक वाटले पण ते त्यांना अमेरिकेतील डॉक्टरांनी बोलावले आहे, असे सदस्यांनी स्पष्ट केले.