खाणप्रश्नी लोकांची फसवणूक राजकारण्यांनीही हेरली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:49 AM2018-10-30T11:49:54+5:302018-10-30T11:50:03+5:30
गोव्यातील खनिज खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आतापर्यंत लोकांना व विशेषत: हजारो खाण अवलंबितांना खोटेच सांगितले जात असल्याचे आता गोव्यातील काही राजकारण्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे.
पणजी : गोव्यातील खनिज खाण व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे आतापर्यंत लोकांना व विशेषत: हजारो खाण अवलंबितांना खोटेच सांगितले जात असल्याचे आता गोव्यातील काही राजकारण्यांच्याही लक्षात येऊ लागले आहे. यामुळे काही राजकीय नेते आता संतप्तपणे या विषयावर भावना मांडू लागले आहेत. कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, उपसभापती मायकल लोबो आदींनी जाहीरपणे या विषयावरून जळजळीत सत्य मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
राज्यातील खनिज खाण धंदा सुरू करण्यासाठी गोवा सरकारच्या पातळीवरून व गोव्याच्या खासदारांच्याही पातळीवरून मोठेसे प्रयत्न झाले नाहीत, असे विरोधी काँग्रेस आमदार व काही भाजप आमदारही खासगीत बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे गेले साडेआठ महिने आजारी राहिल्याने व कुणाकडेच मुख्यमंत्रिपदाचा ताबा न दिल्याने खनिज खाण धंद्याचा विषय अत्यंत जोरदारपणे केंद्राकडे मांडलाच गेला नाही. केंद्राने केवळ नावापुरती या विषयाची दखल घेतली. एमएमडीआर कायदा दुरुस्त करावा की गोव्याने सर्वोच्च न्यायालयात जावे या विषयावर चर्चा करण्यातच अगोदर सात महिने गेले. प्रत्येक मंत्री स्वतंत्रपणे केंद्र सरकारला निवेदने देतो पण एकत्रित प्रयत्न होत नाहीत. गोव्यातील राजकीय विषयावरून भाजपचे खासदार अमित शहा यांना भेटतात पण निव्वळ खाणप्रश्नीच बोलण्यासाठी शहा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील खासदारांना व गोव्याच्या मंत्र्यांना मिळत नाही. तरीही खाणी आता लवकरच सुरू होतील, असे भाजपच्या काही नेत्यांकडून लोकांना सांगितले जात आहे.
मंत्री गावडे यांनी मात्र मंगळवारी पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले, की या नोव्हेंबर महिन्यात खनिज खाणी सुरूच होणार नाहीत. गोव्याचा खाण व्यवसाय सुरू होण्यासाठी आणखी एक वर्ष थांबावे लागेल. मंत्री गुदिन्हो यांनी सोमवारी भाजपची बैठक खाणप्रश्नावरून गाजवली. खाणी सुरू होण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, अन्यथा लोकसभा निवडणुकीवेळी भाजपाची अडचण होईल, असा इशारा गुदिन्हो यांनी भाजपच्या आमदारांच्या बैठकीत दिल्याचे सूत्रांनी सांगितले. आमदार लोबो यांनीही गुदिन्हो यांना पाठिंबा दिला व गोव्याचा खाण व्यवसाय सुरू करण्याबाबत केंद्र सरकार गंभीर दिसत नाही, असा मुद्दा मांडला. शेवटी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी आपण सगळेजण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या विषयावरून भेटू या, असे भाजपच्या चारही मंत्र्यांना सांगितले आहे. प्रत्यक्षात तेंडुलकर यांना पंतप्रधानांची अपॉइन्टमेन्ट तरी मिळेल काय हा मोठा प्रश्न आहे, असे काही आमदार बोलतात.