राजकारण्यांनी मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा - जोशुआ डिसोझा
By काशिराम म्हांबरे | Published: October 10, 2023 04:49 PM2023-10-10T16:49:25+5:302023-10-10T16:49:54+5:30
आपण आपल्या जिवनात शरिरासोबत इतरही चाचण्या वेळोवेळी करुन घेतो पण मानसिक चाचणी कधीच करुन घेत नसतो.
म्हापसा: राजकारणात राहून लोकांची चांगल्या पद्धतीने सेवा करणाºया राजकारण्यांनी लोकांना मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी केले आहे.
आपण राजकारणात येण्यापूर्वी आपल्या आईने आपल्याला मानसोपचाराला भेटण्याचा सल्ला दिला. आपण मानसिकरित्या व्यवस्थीत असूनही आईच्या सल्ल्यामुळे मानसोपचार तज्ज्ञाला भेटलो. त्यानंतर पुढील किमान ४ महिने आठवड्यातून एकदा भेटत गेलो. त्यांच्याशी झालेल्या संवादाचा आपल्याला जिवनात तसेच राजकारणात बराच लाभ झाला. लोकांशी संवाद साधण्यास, त्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या समजून घेण्याचा लोकांसमोर न डगमगता बोलण्याचा लाभ यातून आपल्याला झाल्याचे डिसोझा म्हणाले.
येथील जुन्या आझिलो रुग्णालयात काल १० आॅक्टोबर रोजी ते मानसिक स्वास्थ दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. उत्तर गोवा जिल्हा रुग्णालयाच्या मानसिक विभागाच्या वतिने त्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला नगराध्यक्षा प्रिया मिशाळ, डॉ. राजेश धुमे, डॉ. शाहिन सय्यद, उपनगराध्यक्ष विराज फडके, नगरसेविका डॉ. नुतन बिचोलकर आदी मान्यवर उपस्थित होते.
राजकारण्यांना दर दिवशी शेकडो लोक त्यांच्या समस्या घेऊन भेटायला येतात. त्यामुळ्े येणाºया प्रत्येक नागरिकाचे मानसिक स्वास्थ्य पाहून त्यानुसार त्यांच्या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे असते. अशावेळी राजकारण्यांच मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. ते बिघडले तर परिणाम होऊ शकतात. अशावेळी मानसोपचाराचा बराच लाभ होत असतो असेही डिसोझा म्हणाले.
आपण आपल्या जिवनात शरिरासोबत इतरही चाचण्या वेळोवेळी करुन घेतो पण मानसिक चाचणी कधीच करुन घेत नसतात. आपण झोपलो तरी मन चालूच असते. अशावेळी मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी सल्ला घ्यावा असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला डॉ. तन्वी पेडणेकर यांनी कशा प्रकारे मानसिक रुग्णांनी आपली काळजी घ्यावी यावर मार्गदर्शन केले. डॉ. राजेश धुमे यांनीही आपले विचार मांडले.