सनबर्नचे प्रेम का? दक्षिण गोव्यात वाढला विरोध, जनतेने दंड थोपटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2024 08:02 AM2024-07-23T08:02:05+5:302024-07-23T08:02:40+5:30

दक्षिण गोव्यातील जनतेने सनबर्नच्या संभाव्य आयोजनाविरुद्ध दंड थोपटले आहेत.

politics and consequences on sunburn festival in goa | सनबर्नचे प्रेम का? दक्षिण गोव्यात वाढला विरोध, जनतेने दंड थोपटले

सनबर्नचे प्रेम का? दक्षिण गोव्यात वाढला विरोध, जनतेने दंड थोपटले

दक्षिण गोव्यातील जनतेने सनबर्नच्या संभाव्य आयोजनाविरुद्ध दंड थोपटले आहेत. तेथील बहुतेक पंचायतींच्या रविवारी ग्रामसभा झाल्या, त्यावेळी सनबर्न इलेक्ट्रॉनिक डान्स फेस्टिव्हल दक्षिणेत नकोच, असे ठराव घेण्यात आले. भाजप सरकार जर या स्थितीकडे डोळेझाक करणार असेल तर त्यातून सरकारची हानी होईलच, शिवाय अल्पसंख्याक समाज भाजपपासून आणखी दूर जाण्याचा धोका आहे. सासष्टी, मुरगाव अशा तालुक्यांतील ग्रामसभांमध्ये पोटतिडकीने भावना व्यक्त झाल्या आहेत. 

कोणताही इडीएम असला की, त्यात ड्रग्जचा वापर होतोच असा लोकांचा समज झालेला आहे. अर्थात हा समज एकतर्फी नाही. यापूर्वी उत्तर गोव्यात काही इडीएमवेळी ड्रग्जच्या अतिसेवनाने पर्यटक मरण पावल्याची किंवा अत्यवस्थ होऊन इस्पितळात पोहोचल्याची उदाहरणे गाजली आहेत. या पार्श्वभूमीवर लोकांच्या मनात इडीएमबाबत भीती तयार झाली आहे. काही बेपर्वा युवकांना त्याची चिंता नाही पण निदान सावंत सरकारने तरी चिंता करावी असे सुचवावेसे वाटते. लोकांना गृहीत धरता येत नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यातील लोकांना गृहीत धरून भलताच उमेदवार दिला गेला. त्यात पराभव वाट्याला आला. यावेळी सरकार म्हणतेय की- दक्षिण गोव्यात सनबर्न होईल असे आपण जाहीर केलेले नाही. तसेच सनबर्न हा खासगी फेस्टिव्हल आहे. त्याच्याशी सरकारचा काही संबंध नाही. अर्थात हा खासगी इव्हेन्ट असला तरी शेवटी सगळे परवाने सरकारच देते. शासकीय यंत्रणा संगनमताने काही गोष्टी करतात. काही आमदारांचेही अलीकडे इडीएमविषयी प्रेम उफाळून आले आहे. सनबर्न आपल्या भागात व्हायला हवा, असे आमदारांना वाटतेय.

दक्षिण गोव्यातील लोकांना जर सनबर्न नको असेल तर सरकारने आताच भूमिका स्पष्ट करावी, उगाच आगीशी खेळू नये. यापूर्वी दक्षिणेतील जनतेने पर्यावरणविरोधी प्रकल्प, प्रदूषित युनिट, प्रादेशिक आराखडा, एसइझेडविरुद्ध वगैरे आंदोलने छेडलेली आहेत. बहुतेक आंदोलने यशस्वीही झालेली आहेत. दक्षिणेतील खिस्ती बांधव अंधपणाने राज्यकर्त्यांवर विश्वास ठेवत नाहीत. अनेक राजकीय नेते त्यामुळेच आता इतिहासजमा झाले आहेत. चर्चिल आलेमाव, लुईझिन फालेरो, फ्रान्सिस सार्दिन, मिकी पाशेको, कायतू सिल्वा, फिलीप नेरी, आवेर्तान फुर्तादो, बाबू कवळेकरांसह इजिदोर फर्नांडिस, विल्फ्रेड डिसा (बाबाशान) व अन्य अनेक राजकारण्यांना दक्षिणेच्या विधानसभा मतदारसंघांतील जनतेनेच पराभवाचे पाणी पाजले आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीवेळी दक्षिण गोव्यात कितीजण पराभूत होऊ शकतात याची झलक गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी पाहायला मिळाली आहे. दिगंबर कामत यांनाही परिस्थितीची कल्पना आलेली आहे. कोणत्याच सरकारची मस्ती चालणार नाही.

उत्तर गोव्यातील कुंभारजुवेचे भाजप आमदार राजेश फळदेसाई यांनाही अधूनमधून सनबर्नविषयी अधिक प्रेम वाटते. तरुणांना झिंग चढविणारे सोहळे हवे असतात; मात्र आमदारांनादेखील तशाच इव्हेंटचे आकर्षण वाटते हे धक्कादायक आहे. जुनेगोवे परिसरात मिनी सनबर्न व्हायलाच हवा असा आग्रह फळदेसाई यांनी धरून पाहिला, कुंभारजुवे मतदारसंघात सनबर्न व्हायलाच हवा, अशी विनंती आपण पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना करतो, असे फळदेसाई काही महिन्यांपूर्वी बोलले होते. त्यावेळी एका सोहळ्याप्रसंगी खवटेही व्यासपीठावर होते. फळदेसाई यांनी सनबर्नची मागणी लावूनच धरली होती. गेल्या आठवड्यात तर त्यांनी स्पष्टीकरण दिले, ते असे की- कुंभारजुवेतील युवकांना दक्षिण गोव्यात दूर जायचे नाही, इथेच जुनेगोवे परिसरात सनबर्न झाला तर त्यांच्यासाठी चांगले होईल, असे फळदेसाई म्हणाले होते. जुनेगोवेच्या हेलिपॅडची पर्यायी जागाही त्यांनी सुचवली होती. लगेच काल सोमवारी मात्र फळदेसाई यांनी यू-टर्न घेतला. 

जनतेची भावना इडीएमच्या किंवा ड्रग्जच्या बाजूने नाही याची कल्पना कदाचित भाजपने फळदेसाई यांना दिली असावी. त्यामुळे सोमवारी त्यांनी मीडियाशी बोलताना आपली भूमिका बदलली. जुनेगोवे येथे नोव्हेंबरमध्ये नोव्हेना सुरू होतात व डिसेंबरमध्ये सेंट झेवियर फेस्त असते, त्यामुळे सनबर्न आम्हाला नकोच असे फळदेसाई म्हणाले, फळदेसाई यांना लगेच यू-टर्न घ्यावा लागला, पण सनबर्नचे खूळ त्यांच्या डोक्यातून कायमचे गेले तर समाजाचे कल्याण होईल.
 

Web Title: politics and consequences on sunburn festival in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.