मी, राजकारण आणि माझा म. गो. पक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2024 09:19 AM2024-10-31T09:19:36+5:302024-10-31T09:20:29+5:30
आमदारांच्या उड्या आणि पक्षांतराला गोव्याची जनता कंटाळली. म्हणून मी सुरुवातीपासून पक्षांतराविरुद्ध जाहिराती देऊन मोहीम चालवली होती.
- सुदिन ढवळीकर, माननीय वीज आमदार, मडकई मंत्री, मतदारसंघ
आज मी जो लेख लिहितोय, तो सर्वस्वी लोकांनी विचार करण्यासारखा आहे. आज प्रत्येकजण राजकारण म्हणजे व्यवसाय आणि समाजकार्य असा दुहेरी दृष्टिकोन ठेवून पुढे येतोय. पण सखोल विचार केल्यास यावर चर्चा करण्यासारखे खूप काही आहे. मी स्वतः एक चांगला बिल्डर म्हणून १९७८ साली परिचित झालो. क्रिकेटच्या क्षेत्रात मी युवावस्थेपासून असल्याने लोक मला गोवाभर ओळखत होते. मात्र त्यावेळी मला राजकारणाचा गंधदेखील नव्हता. लोकांमध्ये राहून काम करणे हा माझा छंद होता, पण मी विद्यार्थी आंदोलन, हाफ तिकीट आंदोलन अशा चळवळी गोव्यात पाहिल्या व त्यात मनापासून भाग घेतला. नंतर मराठी कोंकणी भाषावाद आला. त्यात मी रवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली सहभागी झालो. राजकारणात मी तेव्हादेखील नव्हतो. मात्र म.गो. पक्षाविषयी मला खूप प्रेम होते. मुक्त गोव्याचे शिल्पकार स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांचे घराणे हे काही कारणास्तव आमच्या कुटुंबाच्या संपर्कात असायचे. प्रथम भाऊ व नंतर स्वर्गीय शशिकलाताई काकोडकर यांच्याशी आमच्या कुटुंबाचा संबंध आला. त्यामुळे मी म.गो. पक्षाकडे जास्त आकर्षित झालो. त्या काळात भाजप नव्हता. जनसंघ होता आणि यु. गो. पक्ष होता. माझी मते युगो पक्षापासून भिन्न होती. त्यामुळे मी युगोकडे आकर्षित होण्याचा प्रश्नच आला नाही.
१९९४ साली विधानसभा निवडणुकीवेळी मी तिकिटासाठी इच्छुक होतो, पण मी कुणावर दबाव आणला नाही. त्यावेळी स्वर्गीय प्रमोद महाजन यांनी आणि फोंड्यातील काही संघ कार्यकर्त्यांनी मला विनंती केली की, मी मडकईतून स्वतंत्रपणे लढू नये. मी भाजपला पाठिंबा द्यावा. मला त्यावेळी रवी नाईक यांचा राग आला होता, कारण त्यांनी म.गो. पक्ष सोडला होता. रवींशी माझे शत्रूत्व नव्हते, पण आम्हाला प्रिय असलेला मगो पक्ष त्यांनी सोडल्यामुळे मला चीड आली होती. त्यामुळेच मी ९४ साली मडकईत श्रीपाद नाईक यांना पाठिंबा दिला.
१९९७ साली मडकई मतदारसंघ व फोंड्यातील काही युवक माझ्याकडे आले. त्यांनी मला राजकारणात उतरण्याची अशी काही गळ घातली की, मी नकार देऊ शकलो नाही. पाचशे युवा-युवतींनी मला निवडून आणू असा शब्द दिला. ९७ सालीच मी मगो पक्षासाठी पडद्याआडून सक्रिय झालो. त्याकाळी विनोद नागेशकर, प्रताप फडते, दिवंगत भिंगी वगैरे माझी साथ देण्यासाठी भक्कमपणे पुढे आले. शशिकलाताई, काशिनाथ जल्मी, रमाकांत खलप यांचा आशीर्वाद लाभला. मला मडकई मतदारसंघात १९९९ साली मगो पक्षाने तिकिट दिले. मी आमदार झालो आणि मग मी कधीच मागे वळून पाहिले नाही. दरवेळी मी मगो पक्षाच्या तिकिटावरून लढलो व निवडून आलो. गरीब समाजासह सर्व समाजघटकांनी मला साथ दिली. या पंचवीस वर्षांच्या काळात मोहाचे क्षण अनेक आले, पण मी कधीच म.गो. पक्ष सोडला नाही. त्याबाबत मी कधीच मोहाला बळी पडलो नाही. मगोपची सिंह निशाणी मी कधीच दूर केली नाही. पंचवीस वर्षे एकाच पक्षात राहणे शक्य आहे हे मी सिद्ध करून दाखवले. मला त्याविषयी अभिमान वाटतो.
मी नव्या तरुणांना संदेश देतो की- ज्यांना सामाजिक कामाची आवड आहे, त्यांनीच राजकारणात प्रवेश करायला हवा. अगोदर समाजकार्याचा अनुभव घ्यावा. लोकांना मदत करावी. लोकांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवावेत आणि मग युवक-युवतींनी राजकारणात यावे. एकदा आमदार झाल्यानंतर लगेच मंत्रिपद मागण्याची चूक कुणीच करू नये. आमदार झाल्यानंतर विधानसभेच्या कामाचा अनुभव घ्यावा. कामकाज, नियम, कायदे शिकून घ्यावेत. त्यांचे ज्ञान प्राप्त करावे. अनुभवी मंत्री, आमदारांकडून नव्या आमदारांनी योग्य ते मार्गदर्शन घ्यावे. त्यांनी चांगल्या मंत्री-आमदारांची विधानसभेत विविध विषयांवरील चर्चा आणि भाषणे ऐकावी, जशी मी नवीन आमदार असताना रमाकांत खलप, मनोहर पर्रीकर, डॉ. विली डिसोझा यांची चर्चा व भाषणे विधानसभेत लक्षपूर्वक ऐकत होतो. नव्या आमदारांनी आपल्या मतदारसंघात अगोदर विकासकामे करून घेण्यासाठी धडपड करावी, कष्ट करावेत. लोकांचा विश्वास प्राप्त करावा.
गोव्यात काँग्रेस सरकारच्या काळात राजकारणाला फुटाफुटीचा रोग जडला. मला तर काँग्रेसने राजकारणातून संपवण्याचाच प्रयत्न केला. मला आणि मगो पक्षाचा त्यावेळचा दुसरा आमदार दीपक ढवळीकर यांच्यावर पक्षांतर केले असा सपशेल खोटा आरोप करून एक वर्ष आम्हाला पवित्र अशा सभागृहात येण्यास बंदी घातली. आमचे आमदारकीचे सर्व अधिकार काढून घेतले. त्याचेच परिणाम आज काँग्रेस पक्ष भोगतोय, कारण एकेकाळी हे सगळे कारस्थान ज्यांनी आमच्याविरोधात घडवून आणले, तेच सर्वजण काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात विराजमान झाले व सत्तेची फळे चाखत आहेत. त्यात सगळेच आले. ९० च्या दशकात एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्यानंतर लगेच आमदार फुटू लागले. त्यामुळेच गोव्यात मोठी राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. पक्षांतर बंदी कायद्याचे धिंडवडे गोव्यात त्या काळात निघाले. लोकांचा यामुळेच काही आमदारांवरील विश्वास उडाला. काँग्रेसने याबाबत गोव्याचे खूप राजकीय नुकसान केले. निवडून आल्यानंतर लगेच काही आमदार मंत्रिपदासाठी पक्ष सोडू लागले. मते देणाऱ्या जनतेचा विश्वासघात करू लागले.
९० च्या दशकात अनेक आमदार सातत्याने फुटले, सरकारे पडली. पूर्ण देशात गोव्याचे नाव काही राजकारण्यांनी त्या काळात खराब केले. काँग्रेसने त्या चुकीचे प्रायश्चित्त घ्यायला हवे.
आमदारांच्या उड्या आणि पक्षांतरे याला गोव्याची जनता कंटाळली. त्यामुळेच मी स्वतः सुरुवातीपासून पक्षांतरांविरुद्ध जाहिराती देऊन मोहीम चालवली होती. मी दोन वर्षे मोहीम राबवताना राष्ट्रपतींना आणि निवडणूक आयोगालाही पत्र लिहिले होते. राष्ट्रीय स्तरावरील माझा पत्रव्यवहार त्यावेळी प्रसिद्धही झाला होता. तरी देखील पक्षांतरे होत राहिली व अजूनपर्यंत चालू आहेत. मी मात्र वेडपट ठरलो. पण सत्य हे अबाधित असते. ते केव्हातरी परिवर्तन घडवून आणील, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. मला अभिमान वाटतो की मी ९९ पासून आतापर्यंत एकदाही म.गो. पक्ष सोडला नाही. माझ्या कुटुंबाला जनसेवेचा वारसाच लाभलेला आहे. पंचवीसच नव्हे तर पन्नास वर्षे देखील तुम्ही एकाच पक्षात राहू शकता आणि आपल्या मतदारसंघाचा विकासही करू शकता. आमिषे अनेक येत असतात, पण त्या आमिषांना बळी पडायचे नसते. लोकांचा विश्वास कायम राहावा म्हणून प्रत्येक आमदाराने स्वतःच्या पक्षासोबत राहायला हवे.
प्रतापसिंग राणे ५० वर्षे विधानसभेत राहिले. ४० वर्षांत त्यांनी आमदारपदी असताना एकदाही पक्षांतर केले नाही. मी पंचवीस वर्षांहून अधिक काळ निष्ठेने म.गो. पक्षासोबत राहिल्यानेच लोकांच्या आदराला आणि विश्वासाला पात्र ठरलो आहे. गरीब जनतेची सेवा करण्याची संधी मला लोकांनी दिली. गोरगरिबांचे कल्याण करण्यासाठी वावरण्याची संधी मला जनतेने दिली. राजकारणात मी आलो, याचे सार्थक झाले, असे मला त्यामुळेच वाटते. माकडउड्या मारल्या असत्या तर मला आज पक्षनिष्ठेवर बोलण्याचा अधिकार राहिला नसता. एका गोष्टीचा उलगडा प्रामुख्याने मला आजपर्यंत झालेला नाही आणि तो म्हणजे लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी पक्ष सोडला त्याबद्दल. कारण गोव्यात भाजप संघटना बांधण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता आणि त्याचसाठी त्यांना भाजपने मुख्यमंत्रिपदी बसवले होते. पण शेवटी त्यांनी देखील पक्ष सोडलाच ना! म्हणजे माणसाला सत्तेची लालसा कुठपर्यंत नेऊ शकते हे या उदाहरणावरून आपण जाणावे.
यापुढे मात्र असे कोणी करू नये. मी हे स्पष्ट लिहितोय, यामागे कुणाची भावना दुखवण्याचा हेतू मुळीच नाही. समजा, अनवधानाने किंवा चुकून कुणाचे मन दुखावले गेले तर माफी असावी, पण जे सत्य असते, त्याची नोंद इतिहासात कुणी तरी करून ठेवायलाच हवी, गोव्याचे भविष्य उज्ज्वल आहे. गोव्याने आतापर्यंत खूप प्रगती केलेली आहे. यापुढेही विकासाची विविध शिखरे हे राज्य गाठणार आहेच. राजकीय स्थैर्य कायम ठेवून आम्हाला पुढे जायचे आहे. मुख्यमंत्रिपदाच्या ऑफर्स एकेकाळी मलाही आल्या होत्या, पण मी विचलित झालो नाही. म.गो. पक्ष सोडा व मुख्यमंत्री व्हा, अशी अट मला एकेकाळी घातली गेली होती, पण मी म.गो. पक्ष कधीच सोडला नाही. हे सांगताना माझे मन अभिमानाने भरून येते. नव्या पिढीने राजकारणात अवश्य यावे, पण सामाजिक काम करावे.
पक्षनिष्ठेला महत्त्व द्यावे. ज्या पक्षात आपण आहे, त्या पक्षावर निष्ठा ठेवावी असा संदेश मी तरुणांना आज दीपावलीनिमित्ताने पुन्हा एकदा देतो. पक्षांतराची वृत्ती म्हणजे नरकासुराची वृत्ती असून तिचे दहन करून पक्षनिष्ठेचे दीप पेटवूया. जेणेकरून समाजात कल्याणाचा पवित्र उजेड कायम पसरून राहील.