म्हापशातून घटलेली भाजपाची टक्केवारी पक्षासाठी चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2019 03:02 PM2019-02-21T15:02:35+5:302019-02-21T15:15:00+5:30

म्हापसा मतदारसंघातून भाजपाचे घटत जाणारे मताधिक्य पक्षासाठी चिंताजनक प्रकार आहे. घटत जाणारे मतदान हे भाजपासाठी चिंताजनक असून होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीतून यंदा मात्र एकंदरीत चित्र वेगळेच पहायला मिळणार आहे.

politics bjp mapusa goa | म्हापशातून घटलेली भाजपाची टक्केवारी पक्षासाठी चिंताजनक

म्हापशातून घटलेली भाजपाची टक्केवारी पक्षासाठी चिंताजनक

Next
ठळक मुद्दे म्हापसा मतदारसंघातून भाजपाचे घटत जाणारे मताधिक्य पक्षासाठी चिंताजनक प्रकार आहे.घटत जाणारे मतदान हे भाजपासाठी चिंताजनक असून होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीतून यंदा मात्र एकंदरीत चित्र वेगळेच पहायला मिळणार आहे. म्हापसा मतदारसंघातील मगोपच्या समितीची बैठक संपन्न झाल्यानंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे.

म्हापसा - म्हापसा मतदारसंघातून भाजपाचे घटत जाणारे मताधिक्य पक्षासाठी चिंताजनक प्रकार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत म्हापशाचे आमदार स्व. अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांची घटलेली मते, मतांची टक्केवारी व झालेल्या एकूण मतदानातून मतांची विभागणी झाल्याने ते विजयी ठरले होते. घटत जाणारे मतदान हे भाजपासाठी चिंताजनक असून होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभुमीतून यंदा मात्र एकंदरीत चित्र वेगळेच पाहायला मिळणार आहे. त्यातून होणारी निवडणूक रंगदार होण्याची चिन्हे आतापासूनच दिसू लागली आहेत. 

२०१२ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत २५,६५९ मतातील बाबूश यांना एकूण १४,९५५ मते प्राप्त झाली होती. त्यावेळी झालेल्या एकूण मतदानातील त्यांना मिळालेल्या मतांची टक्केवारी ७४ टक्के होती. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आशिष शिरोडकर यांच्यापेक्षा १०,१६९ जास्त मते प्राप्त करुन प्रचंड मताधिक्क्यानी ते विजयी ठरले होते. दुहेरी लढत होवून सुद्धा निकालानंतर झालेली ही लढत एकतर्फी होती. 

२०१२ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर २०१४ साली घेण्यात आलेल्या लोकसभेच्या निवडणुकीवेळी म्हापसा मतदारसंघातून भाजपाची आघाडी बरीच कमी झाली होती. विधानसभा निवडणुकीतील त्यांची १० हजार मतांची आघाडी ४ हजार मतांनी कमी होवून ६ हजार मतांच्या घरात आली होती. त्यानंतर २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या एकंदर आघाडीत फार मोठे बदल झाले होते. २०१२ सालच्या तुलनेत डिसोझा यांचे विजयी मताधिक्क्य ३३४१ हजार मतांनी घटले होते. 

२०१२ च्या तुलनेत डिसोझा यांचे मताधिक्क्य २५.८७ टक्क्यांनी घडून २०१७ सालच्या विधानसभेच्या निवडणुकीत ४८.१३ टक्क्यावर आले होते. झालेल्या २२,७६४ मतदानातील १०९५७ मते डिसोझा यांच्या पारड्यात पडली होती. त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी मगोपचे बाळू फडके यांना ४१२९ मते मिळाली होती. याच निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे विजय भिके यांना ३०१३ तर आम आदमी पार्टीच्या श्रद्धा खलप यांना २३२१ व अपक्ष उमेदवार डॉम्नीक आल्फोंसो यांना १५४३ मते मिळाली होती. डिसोझा हे ६८२८ हजार मते मिळवून विजयी ठरले असले तरी विरोधकांना मिळालेल्या मतांची बेरीज मांडली तर डिसोझा यांच्यापेक्षा विरोधकांना मिळालेली मते जास्त होती. 

म्हापसा मतदार संघातील भौगोलिक भागाचा विचार केल्यास या मतदारसंघाची दोन भागात विभागणी झाली आहे. एक शहरी भाग व दुसरा डोंगराळ झोपडपट्टीने व्यापलेला भाग. त्यातील झोपडपट्टी भागावर डिसोझा यांचे वर्चस्व होते. त्याचा परिणाम बाबूश यांच्या एकूण मतावर होत होता. बाबूश यांच्या निधनानंतर होणाऱ्या पोटनिवडणुकीत हा भाग कोणत्या उमेदवाराच्या बाजूने झुकतो यावर विजयी उमेदवार ठरण्याची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपाच्या उमेदवारीवरुन निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांची संख्या जास्त असल्याने याच मुद्यावरुन बंडखोरी होण्याची शक्यता सुद्धा नाकारली जात नाही. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी म्हापसा पालिकेच्या एका नगरसेवकाने आपल्या प्रचार कार्याला सुद्धा सुरुवात केली आहे. 

होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपचा उमेदवार निवडणूक लढवण्याची शक्यता कमी आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारीवर अद्याप निर्णय घेतला नसल्याचे मत आपचे नेते वाल्मिकी नाईक यांनी व्यक्त केले. त्यामुळे त्यांना लाभलेली मते भाजपच्या विरोधात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. मगोपने सुद्धा अद्याप उमेदवारीवर कोणताच निर्णय घेतलेला नाही. म्हापसा मतदारसंघातील मगोपच्या समितीची बैठक संपन्न झाल्यानंतर पुढील निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार सुद्धा ठरला नसला तरी पक्ष म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे. एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेतला असता म्हापसा मतदारसंघातील होणारी पोटनिवडणूक रंगदार ठरण्याची चिन्हे दिसत आहे. 

Web Title: politics bjp mapusa goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.