भाजपामधील असंतुष्टांची आज बैठक, माजी मुख्यमंत्र्यांचे मन वळविण्याचा जोरदार प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 11:11 AM2018-11-08T11:11:55+5:302018-11-08T11:12:09+5:30

भाजपामधील असंतुष्ट ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अनेक माजी मंत्री, माजी आमदार यांची एकत्रित बैठक गुरुवारी (8 नोव्हेंबर)सायंकाळी होणार आहे.

politics in goa bjp | भाजपामधील असंतुष्टांची आज बैठक, माजी मुख्यमंत्र्यांचे मन वळविण्याचा जोरदार प्रयत्न

भाजपामधील असंतुष्टांची आज बैठक, माजी मुख्यमंत्र्यांचे मन वळविण्याचा जोरदार प्रयत्न

googlenewsNext

पणजी - भाजपामधील असंतुष्ट ज्येष्ठ आमदार फ्रान्सिस डिसोझा, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर व अनेक माजी मंत्री, माजी आमदार यांची एकत्रित बैठक गुरुवारी (8 नोव्हेंबर)सायंकाळी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पार्सेकर यांचे मन वळविण्याचे जोरदार प्रयत्न भाजपाच्या गाभा समितीच्या काही सदस्यांनी चालविले आहेत.

गोव्यात भाजपाची स्थापना झाली, त्या वेळेपासून पार्सेकर हे भाजपाचे काम करत आहेत. ते दोनवेळा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले होते. ते माजी मुख्यमंत्री असून त्यांनी पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांना बदला अशी मागणी चालवली आहे. तेंडुलकर यांना बदलले नाही तर पक्ष आणखी खिळखिळा होईल, अशा प्रकारची भीती यापूर्वी पार्सेकर यांनी व्यक्त केली आहे. तेंडुलकर यांच्याविरोधात पार्सेकर यांनी जाहीरपणे टीका केली आहे. फ्रान्सिस डिसोझा यांनीही टीका केली आहे. भाजपामध्ये प्रथमच मोठय़ा प्रमाणात बंडाळी सुरू आहे. भाजपाचे माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, महादेव नाईक, दयानंद मांद्रेकर, गणेश गावकर आदी अनेकांच्या भावना व वेदना आता समान बनल्या आहेत. यामुळे या सर्वांनी गुरुवारी सायंकाळी प्रथम एकत्र भेटावे, चर्चा करावी आणि मग पुढील दिशा ठरवावी असे ठरलेले आहे.

आपण  आजारी असतानाही भाजपामधील कुणीच आपल्या आरोग्याविषयी विचारपूस केली नाही, असे फ्रान्सिस डिसोझा म्हणाले होते. डिसोझा यांच्याच निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी असंतुष्टांची बैठक होईल. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि सरचिटणीस सदानंद शेट तानावडे यांनी बुधवारी प्रथमच डिसोझा यांची भेट घेतली. आपल्याला मंत्रिमंडळातून डच्चू देण्यापूर्वी कल्पना देखील दिली नाही, अशी खंत डिसोझा यांनी तेंडुलकर यांच्यापाशी व्यक्त केली.

पार्सेकर हे जास्त आक्रमक असून त्यांना खासदार नरेंद्र सावईकर व भाजपाचे खजिनदार संजीव देसाई हे बुधवारी रात्री भेटले. तीन आठवड्यानंतर तरी आता तुम्ही भेटला हेही कमी नव्हे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया पार्सेकर यांनी देसाई व सावईकर यांच्यापाशी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली. साखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्नीसह बुधवारी सकाळी पार्सेकर यांच्या हरमल येथील निवासस्थानी भेट दिली.
 

Web Title: politics in goa bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.