... आणि पर्रीकरांनी मंत्र्यांमधील खदखद प्रत्यक्ष अनुभवली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 12:44 PM2018-12-21T12:44:13+5:302018-12-21T13:21:47+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत मनातील खदखद व्यक्त करण्याची संधी यापूर्वी बहुतेक मंत्र्यांना मिळाली नव्हती.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासमोर आक्रमक भूमिका घेत मनातील खदखद व्यक्त करण्याची संधी यापूर्वी बहुतेक मंत्र्यांना मिळाली नव्हती. नोकरभरतीच्या विषयावरून व नोकरभरतीत आपल्या मतदारसंघातील उमेदवारांना मुद्दाम डावलले जात असल्याच्या भावनेतून बहुतेक मंत्र्यांनी पर्रीकर यांच्यासमोर गुरुवारी रात्री आक्रमक भूमिका घेतली. आमचा पाठींबा सरकारला हवा की नको असे देखील विचारण्याची पाळी कला व संस्कृती खात्याचे मंत्री तथा अपक्ष आमदार गोविंद गावडे यांच्यावर आली.
पर्रीकर यांनी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास करंजाळे येथील आपल्या खासगी निवासस्थानी मंत्रिमंडळाची बैठक सुरू केली होती. ती तीन ते साडेतीन तास चालली. आतार्पयत मंत्री प्रशासन ठप्प झाल्याची तसेच अर्थ खात्याकडून व पर्सनल खात्याकडून कामे करून घेताना खूप अडचणी येत असल्याच्या तक्रारी जाहीरपणो करत असे. निषेध म्हणून आपण सचिवालयातच जात नाही असेही एक मंत्री सांगायचे. तुमच्या काय समस्या आहेत असे पर्रीकरयांनी मंत्र्यांना विचारले असता, मंत्र्यांना बोलण्याची संधीच मिळाली. वीज खात्याने कनिष्ठ अभियंते पदासाठी एकूण 64 उमेदवारांची निवड केली आहे. या निवडीवेळी आमच्या मतदारसंघांतील उमेदवार डावलले गेले, अशी तक्रार गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर व गोविंद गावडे यांनी केली. साळगावकर हे एरव्ही संतापत नाहीत पण त्यांनाही आक्रमक भूमिका घ्यावी लागली. त्यांनी उमेदवार निवडीची यादीच मुख्यमंत्र्यांना सादर केली व एकूण 64 पैकी बहुतांश उमेदवार हे वीजमंत्री निलेश काब्राल यांच्यात मतदारसंघातील आहेत असे दाखवून दिले.
आमच्या मतदारसंघातील किंवा तालुक्यातील लोक मुर्ख व फक्त काब्राल यांच्यात मतदारसंघातील उमेदवार हुशार आहेत काय असा प्रश्न साळगावकर यांनी संतप्त होत केला. मंत्री काब्राल यांना चौघा मंत्र्यांनी घेरले व प्रश्नांची सरबत्ती केली. सरकार आमच्या मतदारसंघात कामे करत नाही. आमचा पाठींबा सरकारला हवा की नको असे मंत्री गावडे यांनी विचारले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या खात्याबाबत काही प्रश्न उपस्थित केले व आपण आणि मंत्री ढवळीकर हे दोघेही मगो पक्षाचेच नेते असताना देखील आपली कामे होत नाहीत अशी तक्रार केली. दोघा मंत्र्यांनी अर्थ खात्याविषयी तक्रार केल्यानंतर अर्थ खात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर योग्य ते स्पष्टीकरण दिले. एकंदरीत विविध विषयांवरून मंत्र्यांमध्ये खदखद कशी आहे ते पर्रीकर यांना प्रत्यक्ष कळून आल्याची चर्चा मंत्र्यांमध्ये सुरू आहे.