वधू एक, नवरे अनेक; लोकसभा तिकिटासाठी भाजपमध्येच चुरस 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 12:43 PM2023-12-07T12:43:35+5:302023-12-07T12:45:11+5:30

उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे.

politics of uttar goa constituency for lok sabha 2024 election | वधू एक, नवरे अनेक; लोकसभा तिकिटासाठी भाजपमध्येच चुरस 

वधू एक, नवरे अनेक; लोकसभा तिकिटासाठी भाजपमध्येच चुरस 

उत्तर गोवालोकसभा मतदारसंघ सर्व राजकारण्यांसाठी प्रचंड उत्सुकतेचा विषय बनला आहे. विशेषतः भाजपमध्ये भंडारी समाजातील जे जे कुणी नेते आहेत, त्या सर्वांनाच वाटते की, आपण खासदार होऊ शकतो. तिकीटरुपी वधू जर प्रसन्न झाली तर, आपले काम झालेच म्हणून समजा, असे काही नेते सांगू लागले आहेत. वधू एक आणि नवरे अनेक अशी स्थिती उत्तरेत आहे. म्हणजे भाजपचे तिकीट एकच आहे, इच्छुक मात्र पाचजण आहेत. 'नवरे' हा शब्द केंद्रीय मंत्री तथा उत्तरेचे खासदार श्रीपाद नाईक यांनी चपखलपणे वापरला आहे. तुळशीचे लग्न झाल्यानंतर अनेक नवरे तयार झाले, असे भाष्य करून श्रीपादभाऊंनी अनेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या. 

माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, दिलीप परुळेकर, जयेश साळगावकर, दयानंद सोपटे यांनी तिकीटावर दावा केला आहे. या चौघांपैकी तिघाजणांनी तर गर्जनाच चालविल्या आहेत. श्रीपादभाऊंना तिकीट दिले नाही तर, आम्हाला तिकीट द्या असे हे नेते सूचवतात. परुळेकर व मांद्रेकर आपण खूप ज्येष्ठ आहोत असेही वारंवार सांगत आहेत. सोपटे यांनी श्रीपाद नाईक यांना थोडा वेगळा सल्ला दिल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली, मात्र भाऊ यांना 'जाण्टो' म्हणणे म्हणजे 'ज्येष्ठ' असा अर्थ अपेक्षित आहे, असा खुलासा काल सोपटे यांनी केला. अनेकजण तिकीटावर दावा करत असल्याने श्रीपादभाऊ मनातून थोडे विचलित झाले असतील, पण त्यांनी संयम ठेवला आहे. त्यांनी सोपटे किंवा परुळेकर किंवा मांद्रेकर यापैकी कुणालाच दुरुत्तर दिलेले नाही. शेवटी पक्षाने तिकीट कुणाला द्यावे ते पक्षाकडूनच दिल्लीत ठरविले जाईल. आपण त्याविषयी जास्त भाष्य करणार नाही, पण तिकीटाचा दावा इच्छुकांनी योग्य त्या व्यासपीठावर करावा असा सल्ला काल नाईक यांनी दिला.

श्रीपादभाऊ सातत्याने उत्तर गोवा मतदारसंघातून निवडून आले आहेत. बहुतांश काळ त्यांनी सत्ता पाहिली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत श्रीपाद नाईक जर मडकई मतदारसंघात पराभूत झाले नसते तर कदाचित ते खासदार व केंद्रीय मंत्री होऊ शकले नसते. ९९ साली सुदिन ढवळीकर यांनी भाऊंना पराभूत केले होते. सुदिनचेही नशीब असे की आमदार झाल्यानंतर सुदिन ढवळीकर यांनीही बहुतांश काळ सत्ता अनुभवली. गोव्यात अनेक वर्षे मंत्रिपदाचा मुकुट ढवळीकर यांच्या डोक्यावर राहिला. तसाच मुकुट केंद्रात श्रीपादभाऊंच्या डोक्यावर राहिला. मडकई मतदारसंघात जन्मलेले हे दोन्ही नेते याबाबत नशीबवान ठरले आहेत.

भाजपमधील जास्त नेते दक्षिण गोवा मतदारसंघातून तिकीट मागत नाहीत. कारण तिथे अग्नीदिव्याला सामोरे जावे लागेल. बाबू कवळेकर हे तिकीट मागतात, कारण ते विधानसभा निवडणूक हरले आहेत. नरेंद्र सावईकर तिकीट मागतात, कारण ते लोकसभा निवडणुकीत यापूर्वी पराभूत झालेले आहेत. दामू नाईक यांच्याही मनात तिकीटाची इच्छा आहे, कारण त्यांनीही फातोड्र्थात पराभवाचा अनुभव घेतलेला आहे. जे आमदार किंवा खासदार नाहीत, असे नेते तिकीट मागतात. उत्तर गोव्यात मात्र खरोखर नवऱ्यांचीच रांग आहे. काहींनी बाशिंग तयार ठेवलेय व नवे कपडेही शिवलेत. काहीजणांनी नवऱ्याप्रमाणे मेकअपही केला आहे. भंडारी समाजातूनच उत्तरेत अधिक नवरे तयार झाले आहेत. 

श्रीपाद नाईक यांना भाजपने तिकीट नाकारण्यासारखे सबळ कारण सध्या तरी दिसत नाही. वय झाले तरी, ते अजून सक्रिय आहेत. पूर्ण उत्तर गोवा मतदारसंघात फिरू शकतात. ते फिरतच असतात हे मान्य करावे लागेल. अर्थात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मनात काय येईल ते सांगता येत नाही. कारण कर्नाटकसह विविध ठिकाणच्या विधानसभा निवडणुकांवेळी काही ज्येष्ठांचे पत्ते भाजपने कट केले आहेत. तरी देखील उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांनाच भाजपचे तिकीट मिळू शकते, असे मुख्यमंत्री सावंत किंवा सदानंद तानावडे हे कुणालाही खासगीत सांगतील. मुख्यमंत्री सावंत यांनी तर एकदा साखळीत व एकदा रायबंदर येथे भाऊंच्या वाढदिनी बोलताना त्याविषयी सूतोवाच केलेच आहे. एक स्वामीदेखील भाजपच्या तिकीटावर दावा करतात अशी चर्चा होती. त्यामुळे मुख्यमंत्री सावंत यांनी श्रीपाद हेच आमच्यासाठी भाजपमध्ये स्वामी आहेत, असे जाहीर करून बरेच काही सूचित केले आहे.


 

Web Title: politics of uttar goa constituency for lok sabha 2024 election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.