पाली-सत्तरीत अतिसाराने महिलेचा मृत्यू
By admin | Published: March 6, 2015 01:17 AM2015-03-06T01:17:46+5:302015-03-06T01:19:01+5:30
वाळपई : पाली-सत्तरी येथे अतिसारामुळे (डायरिया) रुक्मिणी भिकाजी पर्येकर (वय ६२) यांचा मृत्यू झाला.
वाळपई : पाली-सत्तरी येथे अतिसारामुळे (डायरिया) रुक्मिणी भिकाजी पर्येकर
(वय ६२) यांचा मृत्यू झाला. डायरियाची लागण झाल्याने आणखी चौघांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
गेले चार दिवस सावंतवाडा-पाली येथे ताप व उलट्या-जुलाबाची साथ सुरू आहे. रुक्मिणी पर्येकर यांनाही त्रास होऊ लागल्याने वाळपई शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने गोमेकॉत दाखल करण्यात आले. काल रात्री त्यांचा मृत्यू झाला. लता विश्वास गावकर यांनाही त्रास होऊ लागल्याने गोमेकॉत पाठविण्यात आले आहे. सध्या डायरियाची लागण झालेल्या द्रौपदी धर्मा सावंत, गिरजू धानो सावंत, संतोष सीताराम सावंत व धानो येसो सावंत हे वाळपई रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालीत आणखी काहीजणांना ताप येत असून डायरियाची साथ सुरू झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. डायरिया झालेल्या रुग्णांचे रक्त वाळपई हॉस्पिटलच्या पथकाने तपासणीसाठी पाठविले असून गावात ज्या ठिकाणाहून पाणीपुरवठा होतो, त्या पाण्याचा नमुनाही पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल उद्या येणार आहे. वाळपई हॉस्पिटलातील अधिकारी सुरेखा परुळेकर, राज्य तपासणी पथकाचे प्रमुख उत्कर्ष बेतोडकर यांनी पाली गावात तपासणी केली.
(प्रतिनिधी)