पैंगबरांविरोधात पोस्ट; मडगाव परिसरात तणाव, मुस्लिम बांधव संतप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 03:13 PM2023-10-01T15:13:34+5:302023-10-01T15:16:00+5:30

मुस्लिम बांधवांनी मडगावच्या दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले.

post against the muslim religion and tension in margao area | पैंगबरांविरोधात पोस्ट; मडगाव परिसरात तणाव, मुस्लिम बांधव संतप्त 

पैंगबरांविरोधात पोस्ट; मडगाव परिसरात तणाव, मुस्लिम बांधव संतप्त 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगावः मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे मुस्लिम बांधव आक्रमक झाले. संशयितावर त्वरित कारवाई करावी या मागणीसाठी काल, शनिवारी मुस्लिम बांधवांनी मडगावच्या दक्षिण गोवापोलिस मुख्यालयात एकत्र येऊन या घटनेचा तीव्र निषेध करत आंदोलन केले.

यावेळी मुस्लिम बांधवांनी जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिस ठाण्यातून जाणार नाही, असा आक्रमक पवित्राही घेतला. सकाळी नऊच्या सुमारास जमलेला हा जमाव दुपारी तीननंतर माघारी परतला. या घटनेमुळे मडगाव भागातील वातावरण तंग बनले आहे. पोलिस सर्व स्थितीवर नजर ठेवून आहेत. अज्ञाताने इन्स्ट्राग्रामवर मोहम्मद पैगंबर यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. काल, शुक्रवारी रात्री यासंबंधी मायणा- कुडतरी व फातोर्डा पोलिस ठाण्यातही या लोकांनी तक्रार दिली होती.

शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास मुस्लिम बांधव दक्षिण गोवा पोलिस मुख्यालयासमोर एकटवले. संशयिताला त्वरित अटक करा, अशी मागणी करताना मुस्लिमांनाच लक्ष्य बनविले जात असल्याचा आरोपही जमावाने केला. हज समितीचे अध्यक्ष उर्फान मुल्ला हेही पोलिस ठाण्यात हजर होते. पोलिसांनी आम्ही या प्रकरणाचा तपास करू असे सांगूनही जमावाचे समाधान झाले नाही. आताच अटक करा, अशी मागणी करून जमावाने पोलिस ठाण्याच्या आवारातच ठिय्या मांडला. परिस्थितीचे गांभीर्य जाणून सासष्टीतील अन्य पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक व पोलिस कुमक बोलावून घेण्यात आली. पोलिसांनी प्रवेशद्वाराजवळ कडेही उभारले. शेवटी दुपारी तीनच्या सुमारास जमाव पांगला.

३ ऑक्टोबरपर्यंत मुदत

मडगाव पोलिसांनी हे प्रकरण भादंसंच्या २९५ (अ) कलम ७ व ५०५ अंतर्गत नोंदवून घेतले आहे. जुनैद शेख यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती. मडगाव पोलिस ठाण्यातून जमाव निघून गेल्यानंतर त्यांनी सुन्नी जामिया मशिदीत बैठक घेतली. ३ ऑक्टोबरपर्यंत पोलिसांना तपास कामासाठी मुदत देण्यात आली.

भर पावसात आंदोलन...

मडगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी या जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास चालू आहे. सायबर पोलिस व अन्य संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले आहे. दोषींवर निश्चित कारवाई होईल, असे देसाई यांनी या जमावाला सांगून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जमावांपैकी काहीजण ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. त्यांनी पोलिस ठाण्याबाहेर रस्त्यावर ठिय्या मांडला. अधूनमधून पावसाची रिपरिप चालू होती.
 

Web Title: post against the muslim religion and tension in margao area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.