मान्सूनोत्तर पावसाने गोव्याला झोडपले, ६ तासात अडीच इंच
By वासुदेव.पागी | Published: November 8, 2023 04:12 PM2023-11-08T16:12:51+5:302023-11-08T16:14:05+5:30
पुढील २४ तासात परिस्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत.
वासुदेव पागी, पणजी: अरबी समुद्रावर निर्माण झालेले चक्रीय वारे आणि कमी दाबाचे क्षेत्र यामुळे बदललेल्या हवामानामुळे गोव्यासह कोंकण किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडला. गोव्यात सरासरी अडीच इंच पावसाची नोंद झाली तर पणजी, दाबोळी व मडगाव भागात २४ तासात ४ इंचाहून अधिक पाऊस पडला. पुढील २४ तासात परिस्थितीत सुधार होण्याचे संकेत आहेत.
मान्सूनोत्तर पावसाने गोव्याला झोडपून काढले. मंगळवारी मध्यरात्री व बुधवारी पहाटेपर्यंत सरासरी ५.२ इंच पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आली. हा पाऊस ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाटासह कोसळला. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या आणि पाणी तुंबल्याचेही वृत्त आहे. गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आता समारोपाच्या टप्प्यावर पोहोचल्या आहेत. परंतु बुधवारच्या दिवसाच्या खेळावर या पावसाचा परिणाम झाल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
का पडला पाऊस
नैऋत्त्य मान्सून गोव्यासह संपूर्ण देशातून हटल्यानंतरही पाऊस पडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असले तरी सध्या पडत असलेल्या पावसाच्या सरी या नैऋत्य मान्सूनच्या नाहीत. अरबी समुद्रावर निर्माण झालेले चक्रीय वारे आणखी सक्रीय झाले आहेत. तसेच त्या पुढची नवीन घटना म्हणजे चक्रीय वाऱ्याबरोबरच अरबी समुद्राच्या इशान्येकडील भागात कमी दाबाचे क्षेत्रही निर्माण झाले आहे. यामुळेच गोव्यासह आजूबाजूच्या किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडला. हे क्षेत्र पश्चीम दिशेला सरकत असल्यामुळे पाऊस हा हळू हळू कमी होणार आहे. त्यामुळे गुरूवारीही गोव्यात पावसाची शक्यता आहे.
मान्सूनोत्तर पावसाचा विक्रम
मान्सूनोत्तर पावसाचे सामान्य प्रमाण हे गोव्यात ७ इंच इतके आहे. परंतु २४ तासात पडलेल्या जोरदार पावसामुळे गोव्यातील मान्सुनोत्तर पाऊस यंदा ८.३ इंच इतका झाला आहे.
पाऊस
म्हापसा- २ इंच
पेडणे : १ इंच
फोंडा १.४ इंच
पमजी: ४ इंच
जुने गोवे: २ इंच
साखळी: १.६ इंच
काणकोण: १ इंच
दाबोळी: ४ इंच
मडगाव: ४ इंच
केपे: २ इंच
सांगे: २ इंच