टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरी
By admin | Published: March 7, 2017 01:41 AM2017-03-07T01:41:24+5:302017-03-07T01:45:16+5:30
पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने
टपाल मतदानाचे भवितव्य अधांतरी
पणजी : विधानसभा निवडणुकीसाठी अजूनही टपाल मतपत्रिकांद्वारे सुरू असलेल्या मतदानाबाबत आरोप व तक्रारी येत असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेतली आहे. आयोगाने तातडीने मंगळवार, दि. ७ रोजी पणजीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. एकंदरीत, आतापर्यंतच्या टपाल मतदानाचे भवितव्यच अनिश्चित व अधांतरी बनले आहे.
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या आल्तिनो येथील कार्यालयात सकाळी अकरा वाजता ही बैठक होईल. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह उत्तर व दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारीही या बैठकीस उपस्थित असतील. टपालाद्वारे झालेले मतदान रद्द केले जावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव गिरीश चोडणकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश भोसले यांच्या शिष्टमंडळाने सर्व विरोधी पक्षांच्या वतीने सोमवारी दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी, निवडणूक आयुक्त ए. के. ज्योती व आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी या शिष्टमंडळाला सोमवारी वेळ दिली होती. दुपारी साडेबारा वाजता आयोगाने चोडणकर व भोसले यांच्याकडून सर्व मुद्दे, अडचणी व समस्या ऐकून घेतल्या. एक तास त्यांनी चर्चा केली. आपण मांडलेल्या मुद्द्यांपैकी बहुतेक मुद्दे आयोगास पटल्याचे भोसले यांनी दिल्लीहून ‘लोकमत’ला सांगितले. आम्ही टपाल मतदानाबाबत तसेच सिरीयल नंबरची माहिती बाहेर फोडली जात असल्याविषयी व अन्य विषयांबाबत ज्या काही शंका उपस्थित करत होतो, त्या शंका मुख्य निवडणूक अधिकारी दिल्लीत आयोगाकडे पोहोचवतच नव्हते, असाही आम्हाला आता दाट संशय येत असल्याचे भोसले म्हणाले.
निवडणुकीची ड्युटी बजावलेल्या साडेसतरा हजार सरकारी कर्मचाऱ्यांना मतपत्रिका दिल्या गेल्या. सरकारी कर्मचारी मुक्तपणे मतदान करूच शकत नाहीत. त्यांच्यावर दबाव येतो; कारण सिरीयल क्रमांक बाहेर फोडला गेला आहे. तो क्रमांक उमेदवारांना व आमदारांना कळल्यामुळे त्यांच्या मतदानाच्या गुप्ततेविषयीही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आतापर्यंतचे टपाल मतदान रद्द करून एकाच दिवशी ईव्हीएम यंत्राद्वारे सर्व साडेसतरा हजार कर्मचाऱ्यांचे मतदान घ्या, अशी मागणी आम्ही आयोगाकडे केल्याचे चोडणकर यांनी बैठकीनंतर सांगितले. (खास प्रतिनिधी)