म्हापसा अर्बनची निवडणूक स्थगित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 11:20 AM2019-03-07T11:20:29+5:302019-03-07T11:28:13+5:30
कायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे.
म्हापसा - कायम चर्चेत असलेल्या म्हापसा अर्बन या बहुराज्य बँकेच्या नव्या संचालक मंडळाची निवड करण्यासाठी २३ मार्च रोजी होणारी निवडणूक स्थगित करुन पुढे ढकलण्यात आली आहे. होणाऱ्या लोकसभा तसेच विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचालक मंडळाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती अध्यक्ष गुरुदास नाटेकर यांनी दिली. दरम्यान नव्या संचालक मंडळाच्या निवडीसाठी नवी तारीख निश्चित होईपर्यत बँकेचे मुंबईतील पीएमसी बँकेत विलीनीकरणावर सुरु असलेली चर्चा यशस्वी ठरण्याच्या मार्गावर आहे. चर्चा यशस्वी ठरल्यास बँकेचे पीएमसी बँक (पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक मर्यादित) या बहुराज्य शेड्युल्ड बँकेत विलीनीकरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पीएमसी बँकेने विलीनीकरणावर तशी तयारी दर्शविल्याची माहिती नाटेकर यांनी दिली.
२४ जुलै २०१५ रोजी म्हापसा अर्बनवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लागू केल्यानंतर बँकेचे दैनंदिन कामकाज हाताळणे कठीण जात असल्याचे कारण देत अध्यक्षांसहित सर्व संचालक मंडळाने आपल्या पदाचे राजीनामे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात दिले होते. दिलेल्या राजीनाम्यानंतर केंद्रीय सहकार निबंधकाने संचालक मंडळाला केलेल्या सुचनेनुसार दिलेल्या राजीनाम्यावर संचालक मंडळानेच योग्य तो निर्णय घ्यावा अशी सुचना केली होती. मात्र कसल्याही प्रकारचे मोठे निर्णय घेण्यावर संचालक मंडळावर बंधन लागू केले होते. केलेल्या सुचनेवरुन म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दिलेले राजीनामे स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नव्या संचालक मंडळाची स्थापना होईपर्यंत बँकेचा ताबा त्याच संचालक मंडळाजवळ सोपवण्यात आला होता. तसेच निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार सुद्धा संचालक मंडळाला दिले होते. त्यानुसार जानेवारीत झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत २३ मार्च ही निवडणुकीची तारीख निश्चित करण्यात आलेली. तशी माहिती म्हापसा अर्बनने केंद्रीय सहकार निबंधक, रिझर्व्ह बँक व इतर संबंधीतांना दिली होती. त्यानंतर निवडणुकीसाठी निर्वाचन अधिकाऱ्याची नेमणूक करुन त्यांनी आपल्या पदाचा ताबा स्वीकारुन निवडणुकीची प्रक्रिया सुद्धा सुरू केली होती.
संचालक मंडळाच्या निवडीसाठी ठरवलेल्या तारखे दरम्यान लोकसभा तसेच विधानसभेच्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याचे त्याचा अडथळा म्हापसा अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी होण्याची शक्यता असल्याने होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली. तशी माहिती नाटेकर यांनी दिली. लोकसभेसाठी होणाऱ्या निवडणुका संपन्न झाल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी नवी तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे ते पुढे म्हणाले. काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाची बैठक संपन्न होवून निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे नाटेकर म्हणाले. या संबंधीची माहिती केंद्रीय सहकार निबंधक, रिझर्व्ह बँक तसेच इतरांना देण्यात आल्याचे ते पुढे म्हणाले.
दरम्यान निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर म्हापसा अर्बनचे मुंबईतील भांडूप येथे प्रमुख कार्यालय तसेच सायन येथे केंद्रीय कार्यालय असलेल्या पीएमसी बँकेत विलीनीकरण करण्यावर चर्चा सुद्धा सुरू करण्यात आली होती. चर्चेनंतर पीएमसी बँकेच्या ऑडीटरांनी बँकेत येवून ऑडीटची तपासणी सुद्धा केली होती. एखाद्या मालमत्तेच्या खरेदीसाठी किंवा विक्रीसाठी लागणारा अहवाल (ड्यु डिलीगन्स रिपोर्ट अथवा योग्य परिश्रम अहवाल) पीएमसी बँकेने म्हापसा अर्बनकडून नेला असल्याची माहिती नाटेकर यांनी दिली. तसेच बँकेचे मुल्यांकन सुद्धा करण्यात आल्याचे ते म्हणाले. विलीनीकरणाची पुढील प्रक्रिया म्हणून पीएमसी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक होणार असून त्यात विलीनीकरणावर चर्चा केली जाणार आहे. सदरच्या बैठकीत विलीनीकरणाला मान्यता मिळाल्यास त्यानंतर म्हापसा अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
म्हापसा अर्बनची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी बँकेचे विलीनीकरण करण्यात यावे अशी रिझर्व्ह बँकेची अट होती. विलीनीकरण शक्य नसल्यास निवडणुका घेण्यात याव्यात असेही म्हणाले. त्यानुसार आम्ही मार्गक्रमण करीत असल्याचे नाटेकर म्हणाले. बँकेला आर्थिक दृष्ट्या तसा त्रास नव्हता पण लागू केलेल्या निर्बंधामुळे परिणाम झाला असल्याचे ते पुढे म्हणाले.