प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:52 AM2019-03-19T01:52:46+5:302019-03-19T02:26:20+5:30

मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

Pramod Sawant took oath as the Chief Minister of Goa | प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ 

प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ 

googlenewsNext

पणजी - मित्रपक्षांच्या नेत्यांसोबत प्रदीर्घ काळ चाललेल्या चर्चा आणि वाटाघाटींनंतर अखेर भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रात्री 1 वाजून 45 मिनिटांनी प्रमोद सावंत यांचा शपथविधी संपन्न झाला. राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सावंत यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.  तसेच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे,  विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, माविन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली.


मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. तसेच कांग्रेसने केलेला सत्तास्थापनेचा दावा आणि भाजपाचे सहकारी पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि मगोच्या नेत्यांनी ताठर भूमिका घेतल्याने सत्तास्थापनेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. अखेरीस मगो आणि गोवा फॉरवर्डच्या नेत्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची अट मान्य झाल्यानंतर भाजपाचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. 




''पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ही जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन,'' असे प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर सांगितले. तसेच यावेळी आपल्या कारकीर्दीचे श्रेय सावंत यांनी मनोहर पर्रीकर यांना दिले. ''मी आज जो काही आहे तो मनोहर पर्रीकर यांच्यामुळेच आहे. मनोहर पर्रीकर हे मला राजकारणात घेऊन आले होते. त्यामुळे मी गोवा विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले तसेच आज माझी मुख्यमंत्रिपदी निवड झाली ती पर्रीकर यांच्यामुळेच झाली आहे."असे प्रमोद सावंत यांनी सांगितले. 





गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून  दोनवेळा  निवडून आले आहेत. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. तथापि, त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळणार आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन्ही घटक पक्षांनी उपमुख्यमंत्रीपद मागितले होते. ते देण्यास भाजप ब-याच चर्चेनंतर तयार झाला.





गोवा फॉरवर्ड व मगोपने जास्त ताणून धरले व भाजपशी संघर्ष केला तर गोवा विधानसभा निलंबित केली जाण्याची शक्यता होती. विरोधी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असला तरी, त्या पक्षाला सरकार स्थापन करू देण्यास भाजप कधीच तयार होणार नाही याची कल्पना मगोप व गोवा फॉरवर्डलाही होती. 

Web Title: Pramod Sawant took oath as the Chief Minister of Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.