Pramod Sawant: मेगा इव्हेंट वन्स मोअर! PM मोदींच्या उपस्थितीत प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 08:34 AM2022-03-28T08:34:16+5:302022-03-28T08:35:20+5:30

प्रमोद सावंत यांच्यासह सात ते आठ मंत्री शपथबद्ध होणार असल्याचे सांगितले जात आहे.

pramod sawant will take oath second time as goa chief minister pm narendra modi attend the ceremony | Pramod Sawant: मेगा इव्हेंट वन्स मोअर! PM मोदींच्या उपस्थितीत प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

Pramod Sawant: मेगा इव्हेंट वन्स मोअर! PM मोदींच्या उपस्थितीत प्रमोद सावंत पुन्हा मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ

Next

पणजी: उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता गोव्यात प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या भव्य सोहळ्याला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. इतकेच नव्हे, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अन्य अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद सावंत यांच्यासह सात ते आठ मंत्री शपथबद्ध होणार आहेत.

गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने दमदार कामगिरी करत ४० जागांपैकी २० जागांवर मोठा विजय प्राप्त केला. याशिवाय महाराष्ट्र गोमतंक पक्षासह अपक्षांचा पाठिंबा मिळाल्यामुळे भाजप मजबूत स्थितीत आहे. पक्षातील अंतर्गत मानापमानामुळे सत्ता स्थापनेचा दावा करण्यास उशीर झाल्याचे सांगितले जात आहे. 

श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर भव्य कार्यक्रम

पणजीजवळ असलेल्या ताळेगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर प्रमोद सावंत यांच्या शपथविधी सोहळ्याची भव्य तयारी करण्यात आली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेश पटेल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मणिपूरचे मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांसह भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात आहे. सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली असून २ हजार सुरक्षा रक्षकांसह, ७०० ट्रॅफिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ड्रोनच्या माध्यमातूनही देखरेख ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रमोद सावंत यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. प्रमोद सावंत यांच्यासह विश्वजित राणे, माविन गुदिन्हो, नीलेश काब्राल, मगोपचे सुदिन ढवळीकर, अपक्ष आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स, रवी नाईक, गोविंद गावडे व रोहन खंवटे यांना शपथ दिली जाणार आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह एक महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: pramod sawant will take oath second time as goa chief minister pm narendra modi attend the ceremony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.