गोव्यात रंगकर्मी प्रशांत म्हादरेळकर यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 12:21 PM2019-08-29T12:21:06+5:302019-08-29T12:21:37+5:30
प्रशांत म्हादरेळकर यांनी अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला.
पणजी : रंगकर्मी प्रशांत म्हादरेळकर यांचे बुधवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मागे आई, पत्नी निता, प्रणिता आणि राधा या मुली असा परिवार आहे. प्रशांत म्हादरेळकर यांनी अशी अचानक ‘एक्झिट’ घेतल्याने कला क्षेत्राला मोठा धक्का बसला. तशा भावना समाजमाध्यमातून व्यक्त होत आहेत.
प्रशांत म्हादरेळकर यांचे वडिलही कलावंत होते. प्रशांत म्हादरेळकर रंगकर्मी तर होतेच पण ते ठाम वैचारिक भूमिका घेत असत. आठ दिवसापूर्वी छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात ( गोमेकॉ) मध्ये दाखल केले होते. गेल्या मंगळवारी त्यांना रूग्णालयातून घरी जाऊ दिले होते. ते विश्रांती घेत होते. बुधवारी, 28 ऑगस्टला रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
माझा जन्म दोनवेळा झाला...
प्रशांत म्हादरेळकर यांनी फेसबुकवर लिहिलेली पोस्ट शेवटची ठरली असावी. ते लिहितात 22 ऑगस्टला रात्री 8 वाजून 45 मिनिटांनी दोन मिनिटांसाठी माझा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी मला वेळेतच पुन्हा जिवंत केले, पण दोन मिनिटांसाठी माझा मृत्यू झाला होता हे वास्तव. त्यामुळे माझा जन्म दोनवेळा झाला.