प्रतापसिंह राणेंचे गोव्यासाठी फार मोठे योगदान; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By किशोर कुबल | Published: January 28, 2024 11:20 PM2024-01-28T23:20:43+5:302024-01-28T23:21:02+5:30

८५ व्या वाढदिनाच्या कार्यक्रमास लोटला जनसागर

Pratap Singh Rane's great contribution to Goa; | प्रतापसिंह राणेंचे गोव्यासाठी फार मोठे योगदान; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

प्रतापसिंह राणेंचे गोव्यासाठी फार मोठे योगदान; मुख्यमंत्री प्रमोद सावंत

किशोर कुबल/ पणजी

पणजी : ‘प्रतापसिंह राणे यांच्यासारखे नेते गोव्याला मिळाले हे आमचे भाग्य होय. गोव्याला घटक राज्य दर्जा त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच मिळाला. राज्याला स्वत:ची भाषा, अस्मिता प्राप्त झाली. राणे यांच्या कारकिर्दीतच अनेक प्रकल्पांची पायाभरणी झाली. त्यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान फार मोठे असून त्यांचा आदर्श कायम लोकांसमोर राहील,’असे उद्गार मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काढले.

येथील श्री भूमिका देवी मंदिराच्या प्रांगणात हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत राणे यांच्या ८५ व्या वाढदिनाचा कार्यक्रम झाला. राणे यांच्या कर्तृत्त्वाचा मागोवा घेणारे तसेच त्यांचा जीवनपट उलगडणारे पत्नी सौ. विजयादेवी यांनी लिहिलेले ‘मेकर ॲाफ मॉडर्न गोवा : दि अनटोल्ड स्टोरी ॲाफ प्रतापसिंह राणे ’ या पुस्तकाचे प्रकाशन याप्रसंगी मुख्यमंत्री प्रमोद सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले.

व्यासपीठावर गौरवमूर्ती प्रतापसिंह राणे, सौ. विजयादेवी राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी  केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राणे यांचे सुपुत्र आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आमदार सौ. दिव्या राणे, प्रतापसिंह यांची कन्या विश्वधरा, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की,‘ सत्तरीच्या लोकांनी पन्नास वर्षे राणेंवर प्रेम केले आणि त्यांना निवडून दिले. राणे यांनीही सत्तरीवासीयांना प्रेम दिले. लोक त्यांना ‘खाशें’ असे प्रेमाने म्हणतात. आमदारकीची तब्बल ५० वर्षे पूर्ण करणारे राणे हे एकमेव नेते ठरले आहेत. राणे यांनी गोव्याच्या सुरवातीपासूनच्या मुख्यमंत्र्यांसोबत काम केले आहे. भाऊसाहेब बांदोडकर, मनोहर पर्रीकर यांचे नाव गोव्यात विकासासाठी घेतले जाते. राणे यांचेही नाव लोकांकडून असेच घेतले जाईल.’

या कार्यक्रमासाठी खास उपस्थित माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले की,‘राणे यांनी मोठे कार्य केले आहे. केवळ गोव्यासाठीच नव्हे तर देशासाठीही त्यांचे योगदान आहे. निसर्ग सांभाळून विकास करता येतो हे राणे यांनी दाखवून दिले. पर्यावरण सांभाळत त्यानी अनेक पायाभूत प्रकल्प आणले. अटबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना मी केंद्रात भाजप सरकारच्या मंत्रिमंडळात मंत्री होतो. राणे तेव्हा गोव्यात कांग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला प्रोत्साहन दिले. 

  'लोकांनी कायम साथ दिली' 

उत्तरादाखल प्रतापसिंह राणे म्हणाले की,‘ मला लोकांनी कायम साथ दिली त्यामुळे मी विकासकामे करु शकलो. गोवा हा भारताचा चमकता हिरा आहे. सदैव गोव्याची प्रगती होत राहो, असे मी ईश्वराकडे मागतो. लोकांनी मला भरभरुन प्रेम दिल्याने सर्वांचे मी आभार मानतो.’

दरम्यान कार्यक्रमानंतर प्रख्यात गायिका हर्षदीप कौर हिने एकापेक्षा एक गीते पेश करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. ज्येष्ठ अभिनेत्री हेमामालिनी हिचाही नृत्याचा कार्यक्रम झाला.

Web Title: Pratap Singh Rane's great contribution to Goa;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.