प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 01:18 PM2019-06-03T13:18:19+5:302019-06-03T13:18:39+5:30

सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाचे आमदार असलेले राणे हे गोवा विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत.

Pratapsingh Rane presented the candidature for the post of president | प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर

प्रतापसिंग राणेंकडून सभापतीपदासाठी उमेदवारी सादर

Next

पणजी : विरोधी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला आहे.


सत्तरी तालुक्यातील पर्ये मतदारसंघाचे आमदार असलेले राणे हे गोवा विधानसभेचे सर्वात ज्येष्ठ सदस्य आहेत. एकूण चाळीस आमदारांपेक्षा सर्वात जास्त अनुभवी आमदार म्हणून राणे ओळखले जातात. त्यांनी अकरावेळा विधानसभा निवडणूक लढवली व एकदाही ते पराभूत झालेले नाहीत. गेली 48 वर्षे ते विधानसभेचे सदस्य असल्याने काँग्रेसच्या सर्व आमदारांनी सभापतीपदासाठी राणे यांचे नाव सुचविले.


 काँग्रेसच्या सर्व आमदारांची सोमवारी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी बैठक घेतली. काँग्रेसकडे एकूण चौदा आमदारांचे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चर्चिल आलेमाव हे विरोधकांच्या बाजूने आहेत की सत्ताधाऱ्यांच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झालेले नाही. राणे यांना बैठकीसाठी येण्यास विलंब झाल्याने काँग्रेसच्या काही आमदारांनी इजिदोर फर्नाडिस यांचे नाव सभापतीपदासाठी सुचविले. फर्नाडिस हे काणकोणचे आमदार असून ते माजी मंत्रीही आहेत. सभापतीपदासाठी विरोधकांचा उमेदवार म्हणून अर्ज भरण्यास इजिदोर तयार झाले होते. मग राणे यांचे काँग्रेसच्या बैठकीत आगमन झाले. बैठकीला काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक डॉ. चेल्लाकुमार हेही उपस्थित होते. राणे यांनी उमेदवारी अर्ज भरावा अशी विनंती आमदारांनी केली. 


राणे यांनी अगोदर थोडा विचार केला व मग आपला होकार कळविला. उमेदवारी अर्ज सादर करण्यास आज मुदत होती. ज्येष्ठ आमदार रवी नाईक, दिगंबर कामत, फिलीप नेरी रॉड्रीग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, नीळकंठ हळर्णकर आदींच्या उपस्थितीत राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांना सादर केला. राणे हे गेली बेचाळीस वर्षे काँग्रेस पक्षात आहेत.

Web Title: Pratapsingh Rane presented the candidature for the post of president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा