'प्रवाह'चे अधिकारी म्हादई खोऱ्यात येणार; मंत्री शिरोडकर यांची माहिती, ५ व ६ जुलै रोजी दौरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 01:25 PM2024-06-27T13:25:53+5:302024-06-27T13:26:08+5:30

जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

pravah officials will come to mhadei tour on 5th and 6th july | 'प्रवाह'चे अधिकारी म्हादई खोऱ्यात येणार; मंत्री शिरोडकर यांची माहिती, ५ व ६ जुलै रोजी दौरा

'प्रवाह'चे अधिकारी म्हादई खोऱ्यात येणार; मंत्री शिरोडकर यांची माहिती, ५ व ६ जुलै रोजी दौरा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : म्हादई नदीच्या प्रश्नावर केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या 'प्रवाह' प्राधिकरणाचे अधिकारी ५ व ६ जुलैला गोव्याला भेट देणार आहेत. म्हादई खोऱ्यात पावसाळ्यातील पाण्याचा प्रवाह, तसेच इतर गोष्टी तपासणार आहेत. जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

४ जुलैला हे पथक महाराष्ट्राला भेट देईल, तर ७ जुलैला कर्नाटकातील कळसा - भंडुरा प्रकल्पाला भेट देणार आहे. तिन्ही राज्यांमधून म्हादई नदीच्या पाण्याचा होणारा प्रवाह तपासला जाईल. जलस्रोतमंत्री शिरोडकर म्हणाले की, 'पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह तपासणे महत्त्वाचे होते. कारण कर्नाटकने गोव्याचे पाणी वळविल्याचे त्यातून स्पष्ट होईल.'

म्हादईवर कर्नाटकने पाटबंधारे प्रकल्प बांधण्याचे काम सुरू करून पाणी वळविल्याने गोवा व कर्नाटक यांच्यात पाणीतंटा निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवरच 'प्रवाह' प्राधिकरण स्थापन करण्यात आलेले आहे. प्राधिकरणाचे कार्यालय गोव्यातच आहे. म्हादई पाणी तंटा लवादाने, तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याची योग्यरीत्या अंमलबजावणी केली जात आहे की नाही हे पाहण्यासाठी हे प्राधिकरण नेमलेले आहे.

दरम्यान, ७ जुलैला हे पथक बेळगावला रवाना होणार असून, कणकुंबी, कळसा-भंडुरा येथे कर्नाटकने म्हादई नदीवर केलेल्या बांधकामाची पाहणी करणार आहे. ही पाहणी केल्यानंतर प्रवाहची दुसरी बैठक ८ जुलैला बंगळुरू येथे होणार आहे. पत्रकार परिषदेस जलस्रोत खात्याचे सचिव सुभाष चंद्रा, तसेच मुख्य अभियंता प्रमोद बदामी उपस्थित होते

असा असेल गोवा दौरा

शिरोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार ५ व ६ रोजी रोजी हे पथक सुर्ला येथील धबधबा, त्यानंतर अंजुणे धरण, वाळवंटी नदी, म्हादईच्या वेगवेगळ्या शाखा एकत्र येतात ते उस्ते, गांजे, केरी, लाडकें वझर येथे भेट देईल. वाळवंटी नदीवरील प्रकल्पांबाबत माहिती घेईल.

१०० बंधारे पूर्ण करणार

दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना मंत्री शिरोडकर यांनी अशी माहिती दिली की, प्रस्तावित ३७४ बंधाऱ्यांपैकी १०० बंधारे २०२५ अखेरपर्यंत (पुढील वर्षी) बांधून पूर्ण केले जातील.

 

Web Title: pravah officials will come to mhadei tour on 5th and 6th july

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.