२०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2024 09:43 AM2024-07-10T09:43:58+5:302024-07-10T09:44:39+5:30

आमदारांना कामे करण्याचा दिला सल्ला

preparation for 2027 elections start now said cm pramod sawant | २०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

२०२७ च्या निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू: मुख्यमंत्री सावंत 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोवा विधानसभेची निवडणूक जरी २०२७ मध्ये होणार असली तरी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मात्र आतापासूनच कामाला लागले आहेत. शिवाय गोवा प्रदेश भाजपनेही निवडणुकीच्यादृष्टीने काम सुरू केले आहे. दरवेळी ४५ ते ५० टक्के आमदार निवडणुकीत पराभूत होतात, असा संदर्भ मुख्यमंत्री सावंत यांनी सर्व आमदारांना देऊन तुम्हाला पराभव पुढे टाळायचा असेल तर आताच कामाला लागा, असे बजावले आहे.

सोमवारी मुख्यमंत्र्यांनी सर्व सत्ताधारी आमदारांची बैठक घेतली. त्या बैठकीतील सगळी माहिती सोमवारी बाहेर आली नव्हती. मंगळवारी मात्र काही आमदारांनी 'लोकमत'ला सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री त्या बैठकीत अगदी स्पष्ट बोलले आहेत. दरवेळी विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदारांपैकी ४५ ते ५० टक्के आमदार पराभूत होतात. २०२७ सालच्या विधानसभा निवडणुकीवेळीही आताचे सगळे सत्ताधारी आमदार निवडून यायला हवेत असे आम्हाला वाटते. मात्र त्यासाठी आमदारांनी लोकांच्या कायम संपर्कात रहावे लागेल व लोकांची कामे सतत करावी लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी त्या बैठकीत स्पष्ट केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे त्या बैठकीस उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांना सांगितले की, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीनंतरही भाजपचेच सरकार अधिकारावर येईल. केंद्रात मोदी सरकार अधिकारावर असून भाजपच गोव्यात पुन्हा सरकार स्थापन करील त्याबाबत मला शंका नाही. पण तुम्ही सगळे आमच्यासोबत पुन्हा सत्तेत हवे आहात. त्यासाठी तुम्हाला लोकांची कामे करावी लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

सीएम होण्याची स्वप्ने अन्य कोणी पाहू नयेत : कामत

काहीजण मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहात आहेत. पण ती स्वप्ने यशस्वी होणार नाहीत. २०२७ साली देखील प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप विधानसभा निवडणूक लढवणार आहे. पुन्हा २०२७ मध्ये सावंत हेच मुख्यमंत्री होतील, असे मडगावचे आमदार दिगंबर कामत काल मडगाव येथे झालेल्या भाजपच्या संमेलनात बोलताना म्हणाले. दिगंबर कामत यांनी असे विधान करून एकप्रकारे फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांना टोमणा मारला, असे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या भाजपमधील एक-दोन नेत्यांनाही दिगंबर कामत यांनी अप्रत्यक्षरीत्या अशा विधानातून चिमटा काढला असे देखील
काहीजणांना वाटते.

दिवस ठरवा, अधिकाऱ्यांसोबत मी बैठक घेतो

एखाद्या मतदारसंघातील सर्व विकास कामांबाबत मी सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घ्यायची असेल तर मला सांगा. मी तुमच्यासाठी तशी बैठक घेईन. मांद्रे व डिचोली मतदारसंघातील आमदारांनी सुचविल्यानंतर तशी बैठक आपण घेतली. अन्य मतदारसंघांबाबतही तसाच उपक्रम करू, असे मुख्यमंत्र्यांनी आमदारांना सांगितले.

दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये. आता पुन्हा जोमाने कामाला लागा. ज्या मतदारांनी भाजपाला मतदान केले त्यांचे आभार माना. ज्यांनी केले नाही, त्यांची मते जाणून घेऊन कामाला लागाला, २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप २७ पेक्षा जास्त जागा जिंकेल. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
 

Web Title: preparation for 2027 elections start now said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.