गोव्यात इफ्फीची उत्कंठा शिगेला, तयारीवर अंतिम हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 11:51 AM2017-11-17T11:51:02+5:302017-11-17T11:52:29+5:30
गोमंतकीयांमधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्घाटनासाठी अवघे दोन दिवस क्षिल्लक असून इफ्फीत यावेळी कोणते सिनेमे पाहायला मिळतील याविषयीची चर्चा बहुतांश युवा-युवतींमध्ये आणि एकूणच सिनरसिकांमध्ये सुरू आहे.
पणजी : गोमंतकीयांमधील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. उद्घाटनासाठी अवघे दोन दिवस क्षिल्लक असून इफ्फीत यावेळी कोणते सिनेमे पाहायला मिळतील याविषयीची चर्चा बहुतांश युवा-युवतींमध्ये आणि एकूणच सिनरसिकांमध्ये सुरू आहे. 'न्यूड' आणि 'एस दुर्गा' या दोन सिनेमांना वगळण्याच्या विषयावरून वादाची किनार इफ्फी लाभलेली असली तरी, पणजीनगरी इफ्फीच्या स्वागतासाठी आतुरली आहे. तयारीच्या कामावर आयोजकांकडून अंतिम हात फिरविला जात असल्याचे आढळून येत आहे.
अनेक हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी आपला इफ्फीमधील सहभाग पक्का केला आहे. त्यांनी तसे आयोजकांना कळवले आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या एनएफडीसीतर्फे डीएफएफ आणि गोवा मनोरंजन संस्थेच्या सहकार्याने इफ्फीचे आयोजन केले जात आहे. येत्या 20 नोव्हेंबरला इफ्फीचा उद्घाटन सोहळा होणार आहे. यंदा मराठी भाषेतील 9 सिनेमे इंडियन पॅनोरमा विभागामध्ये प्रदर्शित करण्यासाठी निवडण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने प्रथमच मराठी सिनेमे निवडले गेले आहेत. यावेळी नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, सई ताम्हणकर, दिलीप प्रभावळकर, सुशांत सिंग राजपूत असे कलाकार इफ्फीत भाग घेतील. यापूर्वी गोव्यात झालेल्या काही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये नाना पाटेकर यांनी भाग घेतलेला आहे.
गोव्याची राजधानी असलेल्या पणजीत सध्या पर्यटकांना इफ्फीचा फिल येत आहे. देश-विदेशातील मिळून एकूण सव्वा सात हजार सिनेरसिकांनी इफ्फीचे प्रतिनिधी होण्यासाठी आयोजकांकडे अर्ज केले आहेत. गेल्यावर्षी साडेसात हजार प्रतिनिधींची नोंद इफ्फीसाठी झाली होती. इफ्फी नेक्स्ट जनरेशन अॅट बायोस्कोप या नावाने सिनेमाचे गाव यावेळी इफ्फीस्थळी असेल व हे एक अनोखे वैशिष्ट्य आहे. गोव्यातील महत्त्वाच्या काही शहरांमध्ये इफ्फी काळात सार्वजनिक पद्धतीने सिनेमा दाखविले जाणार आहेत. आल्तिनो (पणजी), मडगाव, वास्को अशा ठिकाणी त्यासाठी तयारी सुरू आहे.
पणजी शहर सजवण्यात आले आहे. रंगकाम पूर्ण झाले आहे. सरकार इफ्फीमध्येच व्यस्त नसले तरी, तयारीचा आढावा मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी नुकताच घेतला. गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र तालक हेही सातत्याने तयारीचा आढावा घेत आहेत. सजावटीच्यादृष्टीने अंतिम हात फिरविला जात असल्याचे पणजीत पहायला मिळते. बांदोडकर मार्गावर म्हणजेच ईएसजी, आयनॉक्स मल्टीप्लेक्स आणि कला अकादमी यांच्यासमोरून जाणा:या इफ्फी रस्त्याच्या दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे.
'न्यूड' आणि 'एस दुर्गा' हे सिनेमे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रलयाने ऐनवेळी वगळल्यामुळे गोव्यातील ज्ञानेश मोघे व अन्य काही चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी संताप व्यक्त केला आहे. गोव्यातील काही सिनेकलाकारांमध्येही अस्वस्था आहे पण इफ्फीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय गोमंतकीयांपैकी कुणी अजून तरी घेतलेला नाही.