दिवाळीच्या जोडीने गोव्यात इफ्फीचाही माहोल तयार होण्यास आरंभ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 10:59 AM2017-10-16T10:59:39+5:302017-10-16T11:00:07+5:30
गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. प्रतिनिधी नोंदणीला बर्यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे.
पणजी : गोव्यात येत्या 20 नोव्हेंबरपासून सुरू होत असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. प्रतिनिधी नोंदणीला बर्यापैकी प्रतिसाद मिळू लागला आहे. ऐन दिवाळीच्या काळात गोव्यात इफ्फीचा माहोलही हळूहळू तयार होऊ लागला आहे. पूर्ण गोवा दिवाळी सणाच्या तयारीत मग्न असताना गोवा सरकारची मनोरंजन संस्था मात्र पूर्णपणे इफ्फीच्या तयारीत मग्न आहे.
गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू झाला असून पर्यटकांनाही भारतीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेध लागले आहेत. इफ्फीला आरंभ होण्यास फक्त 35 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे मनोरंजन संस्थेमध्ये धावपळ सुरू आहे. गेल्यावर्षी आठ हजार प्रतिनिधी इफ्फीत सहभागी झाले होते. यंदा संख्या वाढणे अपेक्षित आहे.
चित्रपट महोत्सव संचालनालयाचे अधिकारीही इफ्फीच्या तयारीत गुंतले आहेत. शेकडो सिनेरसिकांनी गेल्या चार दिवसांत इफ्फीचे प्रतिनिधी म्हणून स्वत:ची नोंदणी करून घेण्यासाठी इफ्फीच्या आयोजकांकडे अर्ज केले आहेत. यात देशभरातील पत्रकारांचाही समावेश आहे. इफ्फीलाच जोडून फिल्म बाजारचे आयोजन केले जाईल. इफ्फीनिमित्ताने पणजीत सुशोभीकरण करणे, हाॅटेल खोल्यांचे आकर्षण तसेच वाहनांचे आरक्षण यासाठीची तयारी सुरू झाली आहे.
पणजीपासून तीन किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये इफ्फीचा उदघाटन व समारोप सोहळा पार पडेल. दरवर्षीप्रमाणे आयनाॅक्स मल्टिप्लेक्स आणि कला अकामीमध्ये इफ्फीचे सारे चित्रपट दाखविले जातील. इफ्फीचे इवेन्ट मॅनेजमेंट, सुशोभीकरण व अन्य कामांसाठी यापूर्वी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.
गोव्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले आहेत. एकाबाजूने दिवाळी व दुसऱ्याबाजूने इफ्फीचा माहोल तयार होत असल्याचा अनुभव पर्यटकही घेत आहेत. बाजारपेठा दिवाळीनिमित्ताने फुलल्या आहेत.