आशियाई ॲालिंपिकसाठी सुविधांवर १०० लाख कोटींपेक्षा अधिक खर्च करण्याची तयारी
By किशोर कुबल | Published: October 26, 2023 08:47 PM2023-10-26T20:47:26+5:302023-10-26T20:48:25+5:30
मोदीजींची घोषणा : २०३६ मध्ये स्पर्धा भरवण्याचा निर्धार
किेशोर कुबल
पणजी : २०३६ मध्ये आशियाई ॲालिंपिक स्पर्धा आयोजनासाठी भारत तयारी करीत असून त्यासाठी शंभर लाख कोटी रुपये खर्चुन साधन सुविधा उभारु. त्याआधी २०३० साली युवा ॲालिंपिक स्पर्धाही देशात होतील, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद मोदी यानी केली. गोव्यात फातोर्डा येथे पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर मोदीजींच्या हस्ते ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन झाले.
मोदीजी म्हणाले की, ‘राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाने गोव्याच्या पर्यटनाला तसेच येथील आर्थिक वृध्दीला मोठा लाभ होणार आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने गोव्यात ज्या क्रीडा सुविधा निर्माण झाल्या आहेत त्यामुळे भविष्यात गोव्यातून देशाला निश्चितच अव्वल खेळाडू मिळतील.
३१ रोजी ‘माय भारत’ अभियान
येत्या ३१ रोजी ‘माय भारत’ अभियानाची सुरवात करु असे जाहीर करताना मोदीजी म्हणाले की, भारत आज प्रत्येक क्षेत्रात अभूतपूर्व वेगाने प्रगती करीत आहे. देशातील युवा वर्गात अभूतपूर्व असा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे. ३१ रोजी ‘रन फॉर युनिटी’ दौडीत देशभरातील युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मोदीजींनी केले.
मोदीजींचे ‘स्वयंपूर्ण फेरी’तून अभिवादन - मुख्यमंत्र्यांकडून घुमट वाद्य भेट
मोदीजींनी सजवलेल्या रथातून फातोर्डा येथील स्टेडियमवर फेरी मारली व उपस्थितांना हात उंचावून अभिवादन केले. या प्रसंगी त्यांच्यासोबत रथावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे होते. रथावर ‘स्वयंपूर्ण फेरी’ असे लिहिले होते. उपस्थित गोमंतकीयांनी मोदीजींचे मोबाइलची टॉर्च पेटवून आगळेवेगळे स्वागत केले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोदीजींना गोव्याची कुणबी शाल व पारंपरिक घुमट वाद्य भेट दिले.
गोव्यात प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होत आहेत. ९ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धा चालणार असून देशभरातील १० हजारांहून अधिक खेळाडू २८ ठिकाणी ४३ पेक्षा जास्त क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेतील.
केंद्रीय क्रीडा व युवा व्यवहारमंत्री अनुराग ठाकूर यांनी देशभरात चालू वर्षी १ हजारहून अधिक खेलो इंडिया केंद्रे उघडली जातील, असे स्पष्ट केले.