गोव्यात सुरू आहे नाताळ सणाची जोरदार तयारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 10:18 AM2017-11-08T10:18:17+5:302017-11-08T10:18:39+5:30
दीपावली उत्साहात पार पडल्यानंतर गोव्याला आता ख्रिसमसचे वेध लागले आहेत. नाताळ सणानिमित्तची तयारी जोरात सुरू झाली आहे.
पणजी : दीपावली उत्साहात पार पडल्यानंतर गोव्याला आता ख्रिसमसचे वेध लागले आहेत. नाताळ सणानिमित्तची तयारी जोरात सुरू झाली आहे. विशेषत: गोमंतकीय ख्रिस्ती बांधवांनी सणानिमित्ताने धावपळ चालवली आहे. चर्चच्या इमारतीही सजू लागल्या आहेत. पंधरा लाख लोकसंख्या असलेल्या गोव्यात ख्रिस्ती धर्मिय बांधवांची लोकसंख्या ही 23 टक्के आहे. धार्मिक सलोखा जपण्याबाबत गोवा राज्य देशात आणि जगात प्रसिद्ध आहे. गोव्यातील हिंदू धर्मियही नाताळ सणात सहभागी होतात आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा
देतात.
नाताळानिमित्त घरात रंगकाम करणे, घरे सजविणे, घराभोवतीचा परिसर स्वच्छ करणे, परदेशातून आणि मुंबईसारख्या ठिकाणाहून येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठीची तयारी करणे अशा कामांमध्ये सध्या गोव्यातील ख्रिस्ती बांधव व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे. ख्रिस्ती महिलाही नाताळानिमित्त विविध प्रकारचे खाद्यपदार्थ करण्याच्या कामात सध्या मग्न आहेत. एक प्रकारची लगीनघाईच सुरू असल्याचा अनुभव ख्रिस्ती धर्मियांच्या घरांमध्ये येत आहे. जिंगल बेल आणि मेरी ख्रिसमसचा माहोल यापुढे निर्माण होणार असल्याची चाहुल देणारे वातावरण आता गोव्यात तयार होत आहे.
गोव्यातील सासष्टी, बार्देश, तिसवाडी आणि मुरगाव या तालुक्यांमध्ये जास्त संख्येने ख्रिस्ती कुटुंबे राहतात. दीपावलीनिमित्ताने हिंदू घरे जशी सजलेली असतात व आकाश कंदिल आणि रोषणाई केली जाते तशीच सजावट नाताळानिमित्ताने ख्रिस्ती घरांकडून केली जाते. घरासमोर रंगीबेरंगी नक्षत्रे लावून शोभा वाढवली जाते. हॅपी ख्रिसमस आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी गोव्याचे आर्चबिशपदेखील डिसेंबरमध्ये आल्तिनो येथील बिशप पॅलेसच्या ठिकाणी सर्वधर्मिय महनीय व्यक्तींसाठी चहापानाचे आयोजन करतात. त्यात मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री सहभागी होतात.
गोव्यात नाताळाला आगमन होण्यापूर्वी जगप्रसिद्ध सेंट झेवियरचे फेस्त पार पडते. लाखो पर्यटक देखील या फेस्तावेळी जुनेगोवे येथील चर्चेसना भेट देतात. नोव्हेंबरच्या अखेरीस नोव्हेना म्हणजेच प्रार्थनेला आरंभ होणार आहे.