फिफा १७ वर्षाखालील महिला विश्वचषक स्पर्धेची तयारी पूर्ण - क्रीडामंत्री गोविंद गावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2022 06:27 PM2022-10-08T18:27:21+5:302022-10-08T18:27:55+5:30
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर,राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे आणि मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
समीर नाईक -
पणजी : गोव क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालय आणि गोवा क्रीडा प्राधिकरण (साग) यांच्या सहाय्याने राज्यात ११ ते ३० ऑक्टोबर या काळात होणाऱ्या फिफा १७ वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दि. १० ऑक्टोबर रोजी ताळगाव पठारावरील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, येथे सायं ४ वाजता उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. पणजीत आयोजित पत्रकार परीषदेत मंत्री गावडे यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांच्यासोबत गोवा क्रीडा प्राधिकरणाचे संचालक अजय गावडे, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या सदस्य वालंका आलेमाव व सागचे प्रशिक्षक संचालक व माजी भारतीय फुटबॉलपटू ब्रुनो कुतिन्हो उपस्थित होते.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर,राज्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे, अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष कल्याण चौबे आणि मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राज्यात ११ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १६ सामने होणार आहे. राज्यात ग्रुप बी आणी ग्रुप डी यांच्यामधील सामने होणार आहे. ग्रुप बी मध्ये न्यूझिलंड, जर्मनी, चिली आणि नायजेरीया या संघाचा समावेश आहे. तर ग्रुप डी मध्ये कॅनडा, फ्रान्स, जपान, व तंझानिया या चार संघाचा समावेश आहे. स्पर्धेसाठीची तिकिट विक्री सुरु झाली आहे. ऑनलाईन तिकिट उपलब्ध आहेतच, परंतु फातोर्डा येथील स्विमिंग पूलजवळ तिकिट काऊंटर आहे. त्याचप्रमाणे विविध फुटबॉल क्लब्स, आणि रविंद्र भवन, मडगाव येथेही तिकिट उपलब्ध करुन देण्यात आले आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
देशातील पहिली हायब्रीड फुटबॉल पीच फातोर्डा येथील पं. जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर तयार करण्यात आली आहे. फिफाने मोफत ही पीच आम्हाला तयार करुन दिली असून, येथेच सर्व सामने होणार आहे. या विश्वचषकाची पूर्ण तयारी झाली आहे, शाळकरी सामने पाहण्यास नेण्यात येणार आहे. गोव्यातील मुलींनी यातून प्रेरणा घेत आपले करीअर फुटबॉलपटू म्हणून घडवावेे, यासाठी हे प्रयत्न सुरु आहे, असेही मंत्री गावडे यांनी पुढे सांगितले.