कलाकार, सांस्कृतिक संस्थांमुळे संस्कृतीचे जतन: मुख्यमंत्री, सांस्कृतिक, युवा सृजन पुरस्कारांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 12:01 PM2023-12-28T12:01:03+5:302023-12-28T12:02:08+5:30
देशाची सांस्कृतिक राजधानी बनण्याची क्षमता गोव्याकडे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पाश्चात्य संस्कृतीपासून आपली संस्कृती जतन करण्याचे कार्य कलाकार आणि सांस्कृतिक संस्थांनी केले आहे. गोव्यात आता आध्यात्मिक, सांस्कृतिक पर्यटन विकसित होत आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी बनण्याची क्षमता गोव्याकडे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
कला संस्कृती संचालनालयातर्फे कला अकादमीच्या मा. दीनानाथ कला मंदिरात बुधवारी झालेल्या राज्य सांस्कृतिक पुरस्कार व युवा सृजन पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर अभिनेत्री मधुरा वेलणकर - साटम, सांस्कृतिक खात्याच्या सचिव स्वेतिका सचन, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष कमलाकर म्हाळशी, मध्यवर्ती ग्रंथालयाचे ग्रंथपाल डॉ. सुशांत तांडेल, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप व उपसंचालक अशोक परब उपस्थित होते.
यावेळी त्यांच्याहस्ते विविध कला क्षेत्रातील १२ कलाकारांना राज्य सांस्कृतिक तसेच ६ युवा कलाकारांना युवा सृजन पुरस्कार प्रदान करण्यात आले. २०२३ - २४चा उत्कृष्ट सांस्कृतिक संस्था पुरस्कार कला शुक्लेन्दू संस्थेला, तर उत्कृष्ट वाचनालयासाठीचा पुरस्कार श्री सरस्वती वाचनालय, माडेल थिवी संस्थेला त्यांच्या हस्ते देण्यात आला. सगुण वेळीप यांनी स्वागत केले. गोविंद भगत यांनी सूत्रसंचालन केले. अशोक परब यांनी आभार मानले. मधुरा वेलणकर यांचा यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सांस्कृतिक पुरस्कार
नरेश कडकडे (नाटक), शैलेशचंद्र रायकर, विठ्ठल गावस, तुकाराम शेट, मानुएल गोम्स (साहित्य), होर्तेनसिओ एदुआर्दो वाझ इ परेरा, मिनिनो फर्नाडिस बांदार (तियात्र), शिवराय फोंडेकर, प्रदीप शिलकर, श्रीधर बर्वे (भारतीय संगीत), ज्ञानेश्वर वाइजी (ललित कला), उल्हास पाळणी (भजन).
युवा सृजन पुरस्कार
निवेदिता चंदोजी (नाटक), वेलन्सी डिसोझा (तियात्र), अन्वेशा सिंगबाळ (साहित्य), दशरथ नाईक (संगीत), कलानंद कामत बांबोळकर (चित्रकला व नाटक), संजय कुर्दीकर (लोककला).
कलाकार म्हणून गोव्यात आले की, आंतरिक आनंद मिळतो. इथे कलाविषयक वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. प्रत्येक कलेला आश्रय देणारे हे राज्य आहे. इथला रसिक प्रेक्षकही कलेचा आदर व कलेवर प्रेम करणारा आहे. - मधुरा वेलणकर.